प्रत्येक तालुक्यात संविधान भवन उभारणार – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे
छत्रपती संभाजीनगर : येत्या चार दिवसांनी आपण देशाचा स्वातंत्र्य दिवस साजरा करणार आहोत. बाबासाहेबांनी लिहिलेली राज्यघटना होती म्हणूनच आपण एक प्रजासत्ताक, सार्वभौम राष्ट्र म्हणून जगभर ओळखले जाऊ लागलो. ‘जब तक सुरज चांद रहेगा, बाबासाहेबका संविधान रहेगा’, बाबासाहेबांच्या संविधानाचा आदर वाढावा, त्याद्वारे सामाजिक न्यायाची भावना अधिक दृढ व्हावी, यासाठी प्रत्येक तालुक्यात संविधान भवन उभारण्यात येईल, अशी घोषणा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज येथे केली. तसेच शहराचा डीपी प्लॅन हा सर्वांच्या हिताचा असेल तोच करु अशी ग्वाही त्यांनी शहरवासियांना दिली.
छत्रपती संभाजीनगर येथील टीव्ही सेंटर चौकात आज ‘मुख्यमंत्री कृतज्ञता सोहळा’ आयोजित करण्यात आला होता. या सोहळ्यात अजिंठा लेणी पायथ्याशी जागतिक दर्जाचे बुद्ध विहार विपश्यना केंद्र उभारणी व डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुर्णाकृती पुतळ्याच्या उभारणीसाठी ५० कोटी रुपये, भडकल गेट येथे डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळा सौंदर्यीकरणासाठी पाच कोटी रुपये, टीव्ही सेंटर येथे छत्रपती संभाजीमहाराज पुतळा व अशोक स्तंभ उभारणीसाठी पाच कोटी रुपये, डॉ.बाबासाहेब आंबेडकर वाचनालयासाठी २५ कोटी रुपये, डॉ.बाबासाहेब आंबेडकर रिसर्च सेंटर डीजीटल प्रोजेक्टसाठी २५ कोटी रुपये, तारांगणासाठी १० कोटी तसेच मागासवर्गीय औद्योगिक सहकारी संस्थेमार्फत बेरोजगारांना मदत अशा विविध विकास प्रकल्पांना निधी दिल्याबद्दल आज आंबेडकरी समाज समितीतर्फे मुख्यमंत्री श्री. शिंदे यांच्याबद्दल कृतज्ञता व्यक्त करण्यात आली.
या सोहळ्यास केंद्रीय आरोग्य राज्यमंत्री प्रतापराव जाधव, राज्याचे पणन व अल्पसंख्याक विकास व औकाफ मंत्री तथा जिल्ह्याचे पालक मंत्री अब्दुल सत्तार, गृहनिर्माण मंत्री अतुल सावे, खासदार संदिपान भुमरे, आमदार प्रदीप जयस्वाल, संजय शिरसाट तसेच संयोजक जालिंदर शेंडगे व सर्व समिती सदस्य उपस्थित होते.
प्रारंभी छत्रपती शिवाजी महाराज व डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमांचे पूजन करण्यात आले. त्यानंतर मुख्यमंत्री शिंदे यांना मानपत्र देऊन त्यांच्याबद्दल कृतज्ञता व्यक्त करण्यात आली. त्यानंतर मुख्यमंत्री शिंदे यांनी उपस्थितांशी संवाद साधला.
No comments