ठाणे जिल्ह्यात दुष्काळ जाहीर करून शेतकऱ्यांना तातडीने नुकसानभरपाई द्या! आमदार किसन कथोरे यांची मुख्यमंत्र्यांकडे मागणी
कुणाल
शेलार / मुरबाड :
ठाणे जिल्ह्यातील शेतकऱ्यांचे झालेल्या नुकसानीची गंभीर दखल घेत आमदार किसन कथोरे
यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेऊन ठाणे जिल्ह्यात दुष्काळ जाहीर
करण्यासह नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना तातडीने नुकसानभरपाई देण्याची मागणी केली.
यावेळी शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर मुख्यमंत्र्यांशी सविस्तर चर्चा करण्यात आली.
या भेटीदरम्यान ठाणे
जिल्ह्यात ज्या ज्या शेतकऱ्यांचे शेतीपिकांचे नुकसान झाले आहे, त्या सर्व शेतकऱ्यांचे ठाणे जिल्हाधिकाऱ्यांमार्फत तातडीने पंचनामे
करण्यात येतील आणि पंचनाम्यांच्या आधारे शासनाच्या वतीने नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना
आवश्यक ती मदत दिली जाईल, असे आश्वासन मुख्यमंत्र्यांनी दिल्याची
माहिती आमदार किसन कथोरे यांनी पत्रकारांशी संवाद साधताना दिली.
यावेळी आमदार किसन
कथोरे यांनी प्रसारमाध्यमांच्या प्रतिनिधींनाही महत्त्वाचे आवाहन केले. ठाणे
जिल्ह्यातील ज्या ज्या भागांमध्ये शेतकऱ्यांचे नुकसान झाले आहे, त्या नुकसानीची माहिती पत्रकारांनी आपल्या माध्यमातून अथवा थेट प्रशासनाला
कळवावी. त्यामुळे नुकसानग्रस्त शेतकऱ्यांची माहिती प्रशासनापर्यंत जलद गतीने
पोहोचण्यास मदत होईल आणि शासनाच्या माध्यमातून शेतकऱ्यांना तातडीने मदत मिळवून
देणे शक्य होईल, असे त्यांनी सांगितले.
दरम्यान, आमदार किसन कथोरे यांनी पत्रकारांची सदिच्छा भेट घेतली. यावेळी त्यांनी
पत्रकारांशी अनौपचारिक गप्पा मारत विविध विषयांवर संवाद साधला. तसेच उपस्थित
पत्रकार आणि ठाणे जिल्ह्यातील तमाम जनतेला दीपावली सणाच्या मनःपूर्वक शुभेच्छा
दिल्या.
शेतकऱ्यांच्या
अडचणीच्या काळात त्यांना दिलासा मिळावा, त्यांच्या
नुकसानीची योग्य नोंद व्हावी आणि शासनाची मदत वेळेत त्यांच्यापर्यंत पोहोचावी,
यासाठी आमदार किसन कथोरे यांनी केलेला हा पाठपुरावा महत्त्वपूर्ण
मानला जात आहे.



No comments