web-banner-lshep2024

Breaking News

दिवाळी आली की स्वयंघोषित पत्रकारांचा उगम:दिवाळी संपली की पत्रकारितेचा वनवास! पत्रकारितेच्या बाजारात मूल्यांचा लिलाव थांबणार कधी?

 

नामदेव शेलार / मुरबाड : पत्रकारिता हे केवळ नावापुढे पत्रकार लावण्याचे, गळ्यात ओळखपत्र अडकवण्याचे किंवा राजकीय पुढाऱ्यांच्या दारात उठबस करण्याचे क्षेत्र नाही. पत्रकारिता म्हणजे समाजाप्रती असलेली बांधिलकी, सत्याचा शोध, अन्यायाविरुद्ध संघर्ष आणि सत्तेला निर्भीडपणे प्रश्न विचारण्याचे नैतिक धैर्य! मात्र आज पत्रकारितेच्या क्षेत्रात निर्माण झालेली परिस्थिती पाहता, कुणीही यावे आणि स्वतःला पत्रकार म्हणवून घ्यावे, अशी अवस्था निर्माण झाली आहे. बातमीचे प्राथमिक ज्ञान नाही, पत्रकारितेच्या मूल्यांची जाण नाही, अभ्यास नाही, लेखनाची क्षमता नाही, प्रत्यक्ष वार्तांकनाचा अनुभव नाही; तरीही सोशल मीडियावर कॉपी-पेस्ट बातम्या, कृत्रिम बुद्धिमत्तेच्या मदतीने तयार केलेला मजकूर किंवा वृत्तपत्रातील बातम्यांचे फोटो टाकून पत्रकारितेचा आव आणणाऱ्यांची संख्या वाढताना दिसत आहे.

यातील गंभीर बाब म्हणजे काही व्यक्ती स्वतःच्या वर्तनावरून संपूर्ण तालुक्यातील पत्रकारांना एकाच मापात मोजतात. स्वतःच्या मर्यादा विसरून संपूर्ण पत्रकारिता क्षेत्राचे प्रतिनिधित्व करण्याचा आव आणतात. किरकोळ स्वार्थ, चहा-बिस्किटे, पॉकेटमनी किंवा वैयक्तिक लाभासाठी पत्रकारितेचा वापर करणाऱ्यांमुळे प्रामाणिक आणि निर्भीड पत्रकारांची प्रतिमाही मलीन होत आहे. काही मोजक्या व्यक्तींच्या वर्तनावरून सर्व पत्रकारांना दोषी ठरविणे हा अन्याय आहे.दिवाळी जवळ आली की अचानक काही स्वयंघोषित पत्रकार सक्रिय होतात. वर्षभर पत्रकारितेच्या क्षेत्रात फारसे योगदान दिसत नाही; मात्र दिवाळीच्या दिवसांत ओळखपत्रे, भेटीगाठी, शुभेच्छा आणि अपेक्षांचे जाळे तयार होते. दिवाळी संपली की हेच पत्रकार पुन्हा कुठे गायब होतात, याचा पत्ताही लागत नाही.

याचा सर्वाधिक फटका बसतो तो वर्षभर बातम्यांसाठी धावपळ करणाऱ्या, सामाजिक प्रश्न मांडणाऱ्या आणि पत्रकारितेच्या माध्यमातून कुटुंबाचा उदरनिर्वाह करणाऱ्या श्रमिक पत्रकारांना. प्रत्यक्ष मैदानात उतरून वार्तांकन करणाऱ्या पत्रकारांना अशा काही व्यक्तींमुळे संशयाच्या नजरेला सामोरे जावे लागते. एकाची चूक आणि बदनामी मात्र संपूर्ण पत्रकारिता क्षेत्राची, ही परिस्थिती बदललीच पाहिजे.पत्रकारितेच्या क्षेत्रात प्रवेशासाठी कोणतेही निकष, प्रशिक्षण, अभ्यास किंवा नैतिक जबाबदारी असू नये का? पत्रकार कोण, त्याचे प्रत्यक्ष योगदान काय, त्याने किती बातम्या केल्या, किती सामाजिक प्रश्न मांडले, त्याला पत्रकारितेच्या मूलभूत मूल्यांची किती जाण आहे, याची पडताळणी होणे आवश्यक आहे.

पत्रकारितेच्या नावाखाली ओळखपत्रांचे वाटप करणाऱ्या संस्था आणि संघटनांनीही आत्मपरीक्षण करण्याची वेळ आली आहे. केवळ सदस्यसंख्या वाढविण्यासाठी कोणालाही पत्रकार म्हणून मान्यता देणे थांबले पाहिजे. प्रशिक्षण, आचारसंहिता, प्रत्यक्ष कामाचा अनुभव आणि नैतिक जबाबदारी यांना महत्त्व दिले पाहिजे. अर्थात, अनुभवी आणि उत्कृष्ट पत्रकारांनी केवळ औपचारिक शिक्षणाच्या अभावामुळे आपली ओळख सिद्ध करण्याची गरज नाही; त्यांच्या कामातूनच त्यांची पत्रकारिता स्पष्ट होते. मात्र पत्रकारितेच्या नावाखाली होणाऱ्या गैरप्रकारांना आळा घालण्यासाठी पारदर्शक व्यवस्था आवश्यक आहे.

आज काही राजकीय नेते पत्रकारांचा जाहीरपणे अवमान करतात, पत्रकारांना कमी लेखतात आणि त्यांच्या लेखणीची किंमत स्वतःच्या सोयीनुसार ठरवण्याचा प्रयत्न करतात. अशा वेळी प्रत्येक पत्रकाराने आत्मपरीक्षण करणे गरजेचे आहे. ज्यांच्याकडे आपण वारंवार जातो, ज्यांच्यासमोर विनाकारण लाचारी पत्करतो, त्यांच्याकडून आपल्या पत्रकारितेचा सन्मान अपेक्षित कसा ठेवणार?पत्रकारिता ही कोणत्याही राजकीय नेत्याच्या दावणीला बांधलेली नसते. नेत्यांची मर्जी राखण्यासाठी पत्रकारिता करायची की जनतेचे प्रश्न मांडण्यासाठी, हा निर्णय प्रत्येकाने घेतला पाहिजे. निर्भीड आणि ज्येष्ठ अनुभवी पत्रकारांची लेखणी ही कोणत्याही राजकीय नेत्याच्या पदापेक्षा मोठी असते. कारण नेते बदलतात, सत्ता बदलते; मात्र सत्य मांडणाऱ्या लेखणीचे महत्त्व कधीही संपत नाही.

पत्रकारिता म्हणजे कोणत्याही पक्षाची जाहिरात यंत्रणा नाही, अधिकाऱ्यांची पाठराखण करणारे व्यासपीठ नाही आणि वैयक्तिक स्वार्थ साधण्याचे साधनही नाही. पत्रकाराची खरी ओळख त्याच्या निर्भीड लेखणीतून, अभ्यासपूर्ण मांडणीतून आणि तटस्थ भूमिकेतून निर्माण होते.आज पत्रकार संघटनांनी केवळ सत्कार, मेळावे, पदवाटप आणि प्रसिद्धीपुरते मर्यादित न राहता पत्रकारितेची विश्वासार्हता जपण्यासाठी पुढाकार घेतला पाहिजे. शासनानेही पत्रकारांच्या नावाखाली होणाऱ्या गैरप्रकारांना आळा घालण्यासाठी पत्रकार संघटनांशी चर्चा करून पारदर्शक आणि न्याय्य पडताळणी व्यवस्था उभी करण्याचा विचार केला पाहिजे. मात्र या प्रक्रियेत स्वतंत्र पत्रकारिता, अभिव्यक्तिस्वातंत्र्य आणि सत्तेला प्रश्न विचारण्याचा अधिकार बाधित होता कामा नये.

कारण पत्रकारिता बदनाम झाली तर त्याचा सर्वाधिक तोटा सामान्य जनतेलाच होणार आहे. सत्तेला प्रश्न विचारणारा, अन्यायाला वाचा फोडणारा आणि दुर्बलांचा आवाज बनणारा पत्रकार समाजातून हरवला तर लोकशाहीचा महत्त्वाचा स्तंभ कमकुवत होईल.शेवटी प्रश्न एकच आहे, पत्रकारितेचे ओळखपत्र गळ्यात घातल्याने कोणी पत्रकार होत नाही, मग पत्रकार असल्याचा खरा निकष ठरविणार कोण? पत्रकारिता ही उपजीविकेचे साधन असू शकते; मात्र ती केवळ धंदा नाही, तर जनतेच्या विश्वासाची जबाबदारी आहे.

पत्रकारिता सर्वांची आहे; मात्र काही मोजक्या व्यक्तींच्या चुकीच्या वर्तनामुळे संपूर्ण पत्रकारितेची प्रतिमा मलीन होता कामा नये. ओळखपत्रांची गर्दी नको, तर निर्भीड, अभ्यासू, प्रामाणिक आणि तटस्थ पत्रकारांची गरज आहे. पत्रकारितेचा बाजार मांडणाऱ्यांना आता रोखलेच पाहिजे; अन्यथा उद्या खऱ्या पत्रकाराची ओळख सांगण्याची वेळही समाजावर येईल!

 


No comments