मुरबाडमध्ये मोफत नेत्र तपासणी शिबिर उत्साहात संपन्न;समाजसेवक ॲड.नितीन खारीक यांच्या वाढदिवसानिमित्त सामाजिक उपक्रमाचे आयोजन
गौरव शेलार / मुरबाड : ईशा नेत्रालय मुरबाड यांच्या विद्यमाने समाजसेवक ॲड. नितीन वसंत खारीक यांच्या वाढदिवसानिमित्त गुरुवार, दि. ५ नोव्हेंबर २०२६ रोजी मोफत नेत्र तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. मुरबाड तालुक्यातील नागाचा खडक येथे सकाळी १० ते दुपारी २ वाजेपर्यंत पार पडलेले हे शिबिर उत्साहात संपन्न झाले.
या शिबिरामध्ये नागरिकांची मोफत मोतीबिंदू तपासणी, चष्म्याचा नंबर तपासणी, डोळ्यांच्या तिरळेपणाची तपासणी तसेच डोळ्यांच्या कर्करोगासंदर्भातील तपासणी करण्यात आली. तसेच मोतीबिंदू शस्त्रक्रिया अल्पदरात उपलब्ध करून देण्याची सुविधाही देण्यात आली.
विशेष म्हणजे, महात्मा ज्योतिबा फुले जनआरोग्य योजनेअंतर्गत पिवळ्या व केशरी रेशनकार्डधारकांसाठी रेटिना शस्त्रक्रिया मोफत करण्याची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. तसेच लहान मुलांच्या तिरळेपणावरील शस्त्रक्रियाही मोफत करण्यात येणार असल्याची माहिती आयोजकांकडून देण्यात आली.
वाढदिवसाच्या निमित्ताने अनावश्यक खर्च व दिखाव्याला फाटा देत नागरिकांच्या आरोग्याच्या दृष्टीने उपयुक्त असा सामाजिक उपक्रम राबविण्यात आल्याने या उपक्रमाचे परिसरातून कौतुक होत आहे. वाढदिवस केवळ उत्सवापुरता मर्यादित न ठेवता समाजोपयोगी कार्यातून साजरा करण्याचा आदर्श या उपक्रमातून घालून देण्यात आला.



No comments