दिवाळीच्या पहाटे सप्तसुरांची सुरेल मैफिल; भावगीत आणि भक्तिगीतांनी असोसेकर मंत्रमुग्ध!
गौरव शेलार / मुरबाड : समाजसेवक मयूर एगडे यांच्या
पुढाकारातून ‘कुलस्वामिनी स्वर संगीत’चा संगीतमय दिवाळी पहाट कार्यक्रम उत्साहात
संपन्न झाला दिवाळी म्हणजे आनंद, उत्साह आणि मांगल्याचा सण! याच मंगलमय
वातावरणात दिवाळीच्या पहाटे भावगीत आणि भक्तिगीतांच्या सुरेल स्वरांनी असोसे गाव
परिसर भक्तिरसात आणि संगीताच्या आनंदात न्हाऊन निघाला. ‘कुलस्वामिनी स्वर संगीत’
यांच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या या सप्तसुरांच्या संगीतमय मैफिलीने उपस्थित
रसिकांना मंत्रमुग्ध केले.
समाजसेवक तथा कार्यक्रमाचे आयोजक मयूर एगडे यांच्या
नेतृत्वाखाली या सुरेल दिवाळी पहाट कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.
पहाटेच्या प्रसन्न वातावरणात एकापेक्षा एक सरस भावगीते, भक्तिगीते
आणि सुरेल संगीत सादरीकरणामुळे कार्यक्रमाला विशेष रंगत आली. गायकांच्या मधुर
आवाजाला वादकांच्या सुरेल साथीची जोड मिळाल्याने संपूर्ण परिसर संगीताच्या
स्वरांनी भारावून गेला.
या कार्यक्रमात सहभागी झालेल्या गायकांनी आपल्या सुमधुर
गायनातून रसिकांची मने जिंकली, तर तबलावादन आणि अन्य वाद्यांच्या साथीने
प्रत्येक गीत अधिकच श्रवणीय बनले. दिवाळीच्या पहाटे मोबाईल आणि धावपळीच्या
जगापासून काही क्षण दूर राहून संगीताचा आनंद घेण्याची संधी ग्रामस्थांना या
उपक्रमातून मिळाली.
या कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी ग्रामस्थ मंडळ असोसे तसेच गावातील तरुण युवकांनी विशेष सहकार्य केले. सामूहिक सहभाग, सांस्कृतिक जाणीव आणि संगीताविषयीची आवड यांचा सुंदर संगम या कार्यक्रमातून पाहायला मिळाला.दिवाळीच्या पहाटे फक्त दिव्यांची रोषणाई नव्हे, तर सप्तसुरांच्या सुरावटींनीही मनामनांत आनंदाचा प्रकाश उजळवला. अशा सांस्कृतिक उपक्रमांमुळे गावातील एकोपा आणि कला-संस्कृतीची परंपरा अधिक समृद्ध होत असल्याची भावना यावेळी व्यक्त करण्यात आली. यावेळी मोठ्या संख्येने ग्रामस्थ उपस्थित होते.



No comments