web-banner-lshep2024

Breaking News

सायले गावात स्टोन क्रेशरविरोधात ग्रामस्थांचा एल्गार! ग्रामसभेचा ठराव धाब्यावर; टेकडी फोडून क्रेशर उभारणी सुरूच

 

नामदेव शेलार / मुरबाड : मुरबाड-माळशेज महामार्गावरील सायले गावच्या हद्दीत उभारण्यात येत असलेल्या स्टोन क्रेशरमुळे शेती, पर्यावरण आणि नागरिकांच्या आरोग्याला धोका निर्माण होण्याची भीती ग्रामस्थांनी व्यक्त केली आहे. या क्रेशरला विरोध दर्शवत २६ जानेवारी २०२६ रोजी ग्रामसभेत बहुमताने ठराव मंजूर करण्यात आला असून, जिल्हाधिकाऱ्यांनी कोणत्याही प्रकारची परवानगी देऊ नये, अशी मागणी करण्यात आली आहे.

विशेष म्हणजे, ग्रामसभेचा ठराव आणि ग्रामस्थांच्या तक्रारी असतानाही साकेत इन्फाप्रोजेक्ट्स प्रा. लि. या कंपनीकडून क्रेशरचे बांधकाम अंतिम टप्प्यात आले असून मशीन बसविणे आणि वीजपुरवठ्याची तयारी सुरू असल्याचा आरोप ग्रामस्थांनी केला आहे.

क्रेशरमधून निर्माण होणारी धूळ, कर्कश आवाज आणि अवजड वाहनांच्या वाहतुकीमुळे सुपीक शेती नापीक होण्याबरोबरच विद्यार्थ्यांच्या अभ्यासावर आणि नागरिकांच्या आरोग्यावर विपरीत परिणाम होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. टेकडी फोडणे आणि वृक्षतोड यामुळे परिसरातील नैसर्गिक पर्यावरणालाही धोका निर्माण झाला आहे.

दरम्यान, महसूल विभागाने केलेल्या पंचनाम्यात बांधकामासाठी वापरण्यात आलेल्या १५७.५० ब्रास गौणखनिजाबाबत रॉयल्टी भरली नसल्याची नोंद असल्याचा दावा करण्यात आला आहे. तसेच तहसीलदारांच्या मनाई आदेशानंतरही काम सुरू राहिल्याचा आरोप करण्यात येत आहे. त्यामुळे महसूल विभागाच्या कारवाईवरही प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे.

प्रशासनाच्या दारात तक्रारींचा ढीग, पण प्रत्यक्षात टेकडीवर क्रेशरची उभारणी! हा प्रकार म्हणजे ग्रामस्थांच्या विरोधाला केराची टोपली दाखविण्याचा प्रकार असल्याची नाराजी व्यक्त केली जात आहे.पालकमंत्री गणेश नाईक यांनी या प्रकरणात लक्ष घालून संबंधित स्टोन क्रेशरची परवानगी, गौणखनिज उत्खनन, पर्यावरणीय नियम आणि महसूल नोंदींची सखोल चौकशी करावी. तसेच दोषींवर कठोर कारवाई करून सायले गावाचे नैसर्गिक सौंदर्य वाचवावे, अशी मागणी अशी मागणी होत आहे "ग्रामस्थांचा विरोध, ग्रामसभेचा ठराव आणि प्रशासनाचे आदेशही निष्प्रभ ठरणार असतील, तर सामान्य नागरिकांनी न्याय मागायचा तरी कोणाकडे?" असा सवाल आता उपस्थित जात केला आहे.

 

No comments