ठरावाला केराची टोपली; भारत वाईन शॉपला अभय कोणाचे? - मालिका भाग - 2
गौरव
शेलार/ मुरबाड :
मुरबाड शहरातील भारत वाईन शॉपच्या स्थलांतराचा प्रश्न सध्या चर्चेचा विषय
बनला असून, मुरबाड नगरपंचायतीने सर्वानुमते ठराव
मंजूर केल्याचे सांगितले जात असतानाही प्रत्यक्षात संबंधित वाईन शॉप अद्याप त्याच
ठिकाणी सुरू असल्याने प्रशासनाच्या कार्यपद्धतीवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.
मग सर्वानुमते मंजूर झालेला ठराव केवळ कागदोपत्री होता का? की
त्याची अंमलबजावणी करण्याची प्रशासनाची इच्छाशक्तीच नाही?
नगरसेवकांच्या
सर्वानुमते भारत वाईन शॉप स्थलांतरित करण्यासंदर्भात ठराव मंजूर झाल्याची माहिती
समोर येत आहे. मात्र ठराव मंजूर होऊनही प्रत्यक्ष स्थलांतर झालेले नाही. ठराव
मंजूर करणाऱ्या लोकप्रतिनिधींनी त्याच्या अंमलबजावणीचा पाठपुरावा केला आहे का? संबंधित अधिकाऱ्यांनी पुढील कार्यवाही का केली नाही? याचे उत्तर जनतेला दिले पाहिजे.
संबंधित भारत वाईन
शॉपच्या परिसरात न्यू इंग्लिश स्कूल, भारतरत्न
डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे स्मारक, इतर महापुरुषांची
स्मारके, संतोषी माता मंदिर तसेच रहिवासी वर्दळ आणि
सार्वजनिक रहदारी असल्याचा मुद्दा उपस्थित होत आहे. अशा संवेदनशील परिसरात वाईन
शॉप सुरू राहण्याबाबत लागू असलेल्या नियमांचे पालन होत आहे का? शाळा, धार्मिक स्थळे आणि सार्वजनिक ठिकाणांपासूनच्या
अंतराचे अधिकृत मोजमाप प्रशासनाने केले आहे का?
नगरपंचायतीत
सर्वानुमते ठराव मंजूर होतो, पत्रव्यवहार होतो,
कागदोपत्री हालचाली होतात; मात्र प्रत्यक्ष
कारवाई मात्र शून्य! मग सामान्य नागरिकांनी या ठरावाचा अर्थ काय घ्यायचा? लोकांच्या भावना लक्षात घेऊन ठराव करण्यात आला होता की केवळ जनतेच्या
डोळ्यांत धूळफेक करण्यासाठी हा प्रकार करण्यात आला होता, असा
सवाल उपस्थित होत आहे.
संबंधित वाईन शॉपचे
मालक मनुभाई असल्याचे सांगितले जात असताना, या
व्यवसायामध्ये आणखी काही व्यक्ती भागीदार असल्याच्या चर्चा आहेत. मात्र या
भागीदारीचे अधिकृत स्वरूप काय आहे? संबंधित व्यक्तींची नावे
परवाना आणि शासकीय कागदपत्रांमध्ये नोंदवलेली आहेत का? प्रत्यक्ष
गुंतवणूकदार कोण आहेत? भागीदारीतील आर्थिक व्यवहार कायदेशीर
मार्गाने झाले आहेत का? या सर्व बाबींची उत्पादन शुल्क विभाग
आणि सक्षम आर्थिक तपास यंत्रणांनी आवश्यकतेनुसार पडताळणी करावी, अशी मागणी होत आहे.
वाईन शॉपच्या
परवान्याच्या अटी, परिसरासंबंधीचे नियम, आवश्यक परवानग्या आणि इतर कायदेशीर बाबींची तपासणी नियमितपणे होते का?
मुरबाड नगरपंचायत, राज्य उत्पादन शुल्क विभाग
आणि संबंधित अन्न व औषध प्रशासन यंत्रणांनी आपापल्या अधिकारक्षेत्रातील जबाबदारी
पार पाडली आहे का? या सर्व बाबींवर अधिकृत खुलासा होणे
आवश्यक आहे.
एखाद्या
व्यवसायासंदर्भात सर्वानुमते ठराव होऊनही कारवाई होत नसेल, तर त्यामागचे नेमके कारण काय? प्रशासनावर कोणाचा
राजकीय किंवा आर्थिक दबाव आहे का? संबंधित व्यवसायाला काही
अधिकारी जाणीवपूर्वक अभय देत आहेत का? आर्थिक देवाणघेवाण
किंवा अनुचित लाभाच्या माध्यमातून कारवाई रोखली जात असल्याचा संशय व्यक्त केला जात
असला, तरी या आरोपांची स्वतंत्र आणि निष्पक्ष चौकशी होणे
गरजेचे आहे.
शासकीय प्रशासनातील
शिस्त,
पारदर्शकता आणि नियमांची कठोर अंमलबजावणी यासाठी ओळखले जाणारे अधिकारी
तुकाराम मुंढे यांच्या कार्यपद्धतीचा आदर्श प्रशासनाने घ्यावा. नियम सर्वांसाठी
समान असतील, तर मग संबंधित वाईन शॉपच्या बाबतीतही नियमांची
अंमलबजावणी होणार की नाही? हाच खरा प्रश्न आहे.
मुरबाड नगरपंचायतीने
मंजूर केलेल्या ठरावाची प्रत, त्यानंतर झालेला
पत्रव्यवहार, संबंधित विभागांना पाठवलेली पत्रे, प्राप्त झालेली उत्तरे आणि प्रत्यक्ष कारवाईचा अहवाल जनतेसमोर ठेवावा.
तसेच वाईन शॉपच्या परवान्याची, भागीदारीची आणि लागू
नियमांच्या पालनाची सक्षम यंत्रणेमार्फत चौकशी करावी.
कारण प्रश्न केवळ एका
वाईन शॉपचा नाही, तर नगरपंचायतीच्या ठरावाला
किती किंमत आहे आणि प्रशासन सामान्य नागरिकांच्या हितासाठी किती जबाबदार आहे,
याचा आहे.ठराव कागदावर आणि वाईन शॉप प्रत्यक्षात सुरू; मग मुरबाडकरांनी न्याय मागायचा तरी कोणाकडे?



No comments