मुरबाडमध्ये भारत वाईन शॉपची बनावट दारू किती महिलांचे पुसणार सिंदूर ? नगरपंचायतीचा एकमताचा ठरावही निष्प्रभ! (मालिका भाग -1)
गौरव शेलार / मुरबाड : मुरबाड शहरातील मुख्य वर्दळीच्या रस्त्यावर, शाळा-महाविद्यालये, नगरपंचायतीचे मुख्यालय, महापुरुषांची स्मारके आणि धार्मिक स्थळांच्या परिसरात सुरू असलेल्या भारत वाईन शॉपचा प्रश्न आता चांगलाच ऐरणीवर आला आहे. शहराच्या मुख्य वस्तीतून हे मद्यविक्रीचे दुकान हटविण्याची मागणी जोर धरत असतानाच मुरबाड नगरपंचायतीने काही महिन्यांपूर्वी या दुकानासंदर्भात एकमताने ठराव मंजूर केला होता. विशेष म्हणजे, हा ठराव पुढील आवश्यक कार्यवाहीसाठी राज्य उत्पादन शुल्क विभागाकडे पाठविण्यात आल्याची माहिती आहे. मात्र, ठराव पाठवूनही आजपर्यंत भारत वाईन शॉपवर कोणतीही ठोस कारवाई झालेली नसल्याने प्रशासनाच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.
नगरपंचायतीच्या
सर्व लोकप्रतिनिधींनी एकमताने ठराव मंजूर करूनही संबंधित विभागाकडून कारवाई का होत
नाही? नगरपंचायतीचा ठराव
राज्य उत्पादन शुल्क विभागापर्यंत पोहोचला असेल, तर त्यावर
अद्याप निर्णय का घेण्यात आलेला नाही? दुकान हटविण्याच्या
मागणीला प्रशासनाकडून जाणीवपूर्वक विलंब केला जात आहे का? असे
अनेक प्रश्न आता मुरबाडकर उपस्थित करू लागले आहेत.
विशेष
म्हणजे, भारत वाईन शॉपच्या
व्यवहारांबाबत तसेच बनावट मद्यविक्रीबाबतही नागरिकांकडून गंभीर आरोप केले जात
आहेत. या आरोपांची सत्यता तपासणे आवश्यक असताना संबंधित विभागाकडून कोणतीही ठोस
कारवाई दिसून येत नसल्याने नागरिकांमध्ये नाराजी वाढत आहे. दुकानाच्या
मद्यसाठ्याची, खरेदी-विक्रीच्या बिलांची, पुरवठा साखळीची आणि परवान्याच्या अटींची तपासणी झाली आहे का, याचे उत्तर प्रशासनाने देणे गरजेचे आहे.
दरम्यान, दुकानावर कारवाई होत नसल्याने शहरात हप्तेबाजीच्या चर्चांनाही उधाण आले आहे. आर्थिक देवाणघेवाणीमुळेच भारत वाईन शॉपला
पाठीशी घातले जात आहे का, असा संशय नागरिकांकडून व्यक्त केला
जात आहे. मात्र, या चर्चांमध्ये तथ्य आहे की नाही, याचा तपास संबंधित यंत्रणांनी निष्पक्षपणे करणे आवश्यक आहे. या चर्चांना
पूर्णविराम देण्याची जबाबदारीही प्रशासनाचीच आहे.
मद्यविक्रीचे
दुकान मुख्य वस्तीत सुरू असल्याने महिला, विद्यार्थी आणि सर्वसामान्य नागरिकांच्या सुरक्षिततेचा प्रश्नही निर्माण
होत आहे. सार्वजनिक ठिकाणांच्या जवळ मद्यविक्रीसाठी कोणते नियम लागू आहेत, संबंधित दुकानाला परवाना देताना आवश्यक अंतराचे निकष तपासण्यात आले होते
का आणि नगरपंचायतीच्या ठरावानंतर विभागाने नेमकी कोणती कार्यवाही केली, याचा खुलासा होणे आवश्यक आहे.
एकीकडे
महाराष्ट्रात नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर कठोर कारवाईची अपेक्षा व्यक्त केली जात
असताना दुसरीकडे मुरबाडमध्ये नगरपंचायतीचा एकमताचा ठराव राज्य उत्पादन शुल्क
विभागाकडे पाठवूनही दुकान सुरूच राहणे ही गंभीर बाब आहे. संबंधित विभागाने या
ठरावावर काय निर्णय घेतला, कारवाई प्रलंबित
ठेवण्यामागचे कारण काय आणि दुकानाच्या परवान्याबाबत कोणती तपासणी केली, याची माहिती सार्वजनिक करावी.
आता
प्रश्न केवळ भारत वाईन शॉपचा राहिलेला नाही, तर नगरपंचायतीच्या एकमताच्या ठरावाचा आणि प्रशासनाच्या कार्यक्षमतेचा आहे.
लोकप्रतिनिधींनी ठराव मंजूर करायचा, तो राज्य उत्पादन शुल्क
विभागाकडे पाठवायचा आणि तरीही संबंधित दुकान पूर्ववत सुरू राहायचे, तर अशा ठरावांचा उपयोग काय? मुरबाड नगरपंचायत,
राज्य उत्पादन शुल्क विभाग, ठाणे जिल्हाधिकारी
कार्यालय आणि पोलीस प्रशासनाने या प्रकरणाची तातडीने दखल घेऊन भारत वाईन शॉपच्या
परवान्यापासून ते मद्यसाठ्यापर्यंत सर्व बाबींची निष्पक्ष चौकशी करावी.
नगरपंचायतीच्या ठरावावर झालेल्या कार्यवाहीचा लेखी खुलासा करावा. अन्यथा नगरपंचायतीचा
ठराव केवळ कागदावर आणि भारत वाईन शॉपचा व्यवसाय मात्र बिनधास्त सुरू, अशीच मुरबाडकरांची भावना अधिक बळावेल!



No comments