मुरबाड एमआयडी मधील लॉइड्स स्टील कंपनीत कामगाराचा विजेच्या धक्क्याने जागीच मृत्यू!
गौरव
शेलार / मुरबाड : मुरबाड औद्योगिक वसाहतीतील लॉइड्स इंजिनिअरिंग वर्क्स लिमिटेड
या कंपनीमध्ये आज सफाईचे काम करणाऱ्या एका कामगाराचा विजेचा तीव्र धक्का लागून
जागीच मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना घडली आहे. या दुर्घटनेमुळे मुरबाड
एमआयडीसीमधील कामगारांच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे.
मुरबाड
एमआयडीसी परिसरात यापूर्वीही विविध औद्योगिक दुर्घटनांमध्ये कामगारांचा मृत्यू
झाल्याच्या घटना आणि चर्चा समोर आल्या आहेत. कधी विजेचा धक्का, तर कधी अंगावर जड वस्तू पडल्याने कामगारांना
आपला जीव गमवावा लागल्याचे प्रकार घडत असल्याचे बोलले जाते. मात्र अशा घटनांनंतर
संबंधित कंपनीचे मालक, संचालक, व्यवस्थापक
किंवा जबाबदार अधिकाऱ्यांवर नेमकी काय कारवाई होते, याबाबत
नागरिकांमध्ये प्रश्न उपस्थित होत आहेत.
औद्योगिक
आस्थापनांमध्ये कामगारांच्या सुरक्षेसाठी आवश्यक उपाययोजना करणे, विद्युत यंत्रणेची नियमित तपासणी करणे,
सुरक्षा साधने उपलब्ध करून देणे आणि कामाच्या ठिकाणी सुरक्षित
वातावरण निर्माण करणे ही कंपनी व्यवस्थापनाची महत्त्वाची जबाबदारी आहे. असे असताना
वारंवार दुर्घटना घडत असतील, तर संबंधित कंपन्यांच्या
सुरक्षा व्यवस्थेची सखोल तपासणी होणे गरजेचे आहे.
विशेष
म्हणजे मुरबाड एमआयडीसीतील अनेक कंपन्यांमध्ये नेमके कोणते उत्पादन तयार केले जाते, कोणत्या स्वरूपाचे औद्योगिक कामकाज चालते आणि
कामगारांच्या सुरक्षेसाठी कोणत्या उपाययोजना केल्या जातात, याची
माहिती सामान्य नागरिकांना सहज उपलब्ध होताना दिसत नाही. त्यामुळे औद्योगिक
वसाहतीतील कंपन्यांच्या कामकाजाची तसेच सुरक्षा नियमांच्या अंमलबजावणीची पारदर्शक
तपासणी करण्याची मागणी जोर धरू लागली आहे.
आजच्या
दुर्घटनेप्रकरणी पोलिसांनी अपघाती मृत्यूची नोंद केली आहे का? विद्युत सुरक्षेच्या नियमांचे पालन झाले होते
का? कामगाराला आवश्यक सुरक्षा साधने देण्यात आली होती का?
कंपनी व्यवस्थापनाची जबाबदारी निश्चित केली जाणार का? तसेच कामगार विभाग आणि संबंधित औद्योगिक सुरक्षा यंत्रणा या प्रकरणाची
चौकशी करणार का, असे अनेक प्रश्न उपस्थित होत आहेत.
कामगार
हा कोणत्याही उद्योगाचा कणा असतो. मात्र उत्पादन आणि नफ्याच्या गणितात
कामगारांच्या जीविताची सुरक्षा दुर्लक्षित होत असेल,
तर ही अत्यंत गंभीर बाब आहे. आज एका कामगाराचा जीव गेला आहे;
उद्या अशी दुर्घटना दुसऱ्या कोणाच्या बाबतीत घडू नये, यासाठी प्रशासनाने केवळ पंचनामा करून थांबता कामा नये. या घटनेची निष्पक्ष
चौकशी करून दोषी आढळणाऱ्यांवर कायद्यानुसार कठोर कारवाई करावी, हीच अपेक्षा!



No comments