मोन्याची डबल ढोलकी ! साहेबांच्या विरोधकांच्या जागेवर विटा रचून नेमका कोणता डाव?
गौरव
शैलार / मुरबाड : मुरबाडच्या ठेकेदारी विश्वात सध्या एका मोन्याची चांगलीच चर्चा रंगू लागली
आहे. विकासकामांच्या गुणवत्तेपासून ते बिलांच्या चर्चेपर्यंत मोन्या आधीच
चर्चेच्या केंद्रस्थानी आहे. मात्र आता या मोन्याच्या राजकीय आणि व्यावहारिक
चतुराईचीही चर्चा सुरू झाली आहे. कारण ज्या साहेबांच्या आशीर्वादाने आपली ठेकेदारी
फुलते, त्याच साहेबांच्या विरोधकांच्या जागेवर मोन्याने विटा
रचल्याची चर्चा कानावर येत आहे. त्यामुळे राजकीय वर्तुळात एकच प्रश्न उपस्थित होत
आहे, मोन्या नेमका कोणाचा? साहेबांचा
कीविरोधकांचा?
राजकारणात निष्ठा आणि
व्यवहार यांच्यात फरक असतो, हे मान्य; पण मोन्याने तर दोन्ही बाजूंचा समतोल साधण्याची वेगळीच कला आत्मसात
केल्याचे बोलले जात आहे.एका बाजूला साहेबांच्या गोटात आपली उपस्थिती दाखवायची आणि
दुसऱ्या बाजूला साहेबांच्या विरोधकांशीही सलगी ठेवायची, असा
हा दुहेरी खेळ नेमका कशासाठी?
साहेबांच्या विश्वासाचा फायदा घ्यायचा आणि विरोधकांनाही नाराज करायचे नाही, अशी ही राजकीय ठेकेदारीची नवी रणनीती आहे का? मोन्याच्या या हालचालींकडे पाहता एक जुनी म्हण आठवते, दोन्ही हातात लाडू आणि मध्येच सापडला तर फास ! कारण राजकारणात दोन्ही बाजूंना खूश ठेवण्याचा प्रयत्न करणारे अनेकजण शेवटी दोन्ही बाजूंनी उघडे पडतात.
आज साहेबांना आपला वाटणारा
मोन्या उद्या विरोधकांच्या दारात दिसला, तर साहेबांनी
विश्वास तरी कुणावर ठेवायचा? आणि विरोधकांच्या जागेवर विटा
रचण्यामागे केवळ बांधकामाचा व्यवहार आहे की राजकीय समीकरणे जुळवण्याचा प्रयत्न,
हाही प्रश्न अनुत्तरित आहे. अर्थात, या
चर्चेची सत्यता संबंधितांनीच स्पष्ट करावी.
मात्र मोन्याच्या या कथित दुहेरी भूमिकेमुळे शहरात चर्चाना उधाण आले आहे. मोन्याने ठेकेदारीत सिमेंट-वाळूचा हिशेब ठेवावा, पण राजकारणात दोन्ही बाजूंचे पूल बांधताना स्वतःच अडकू नये ! कारण साहेबांच्या नावावर ठेकेदारी आणि विरोधकांच्या जागेवर विटा, असा प्रकार खरोखरच असेल तर ही निष्ठा नसून सोयीची राजकीय गुंतवणूक म्हणावी लागेल.
मोन्याची ढोलकी दोन्ही बाजूंनी
वाजत असेल, पण ताल मात्र एक दिवस साहेबांच्या कानावर आणि
दुसऱ्या दिवशी विरोधकांच्या कानावर पडणारच ! आता पाहायचे एवढेच, मोन्याच्या या डबल ढोलकीचा आवाज साहेबांपर्यंत आधी पोहोचतो की विरोधकांपर्यंत
!



No comments