web-banner-lshep2024

Breaking News

मुरबाडमध्ये गटारीच्या कामात ‘नवीन टेक्नॉलॉजी’चा आविष्कार! बांबूच्या चिंब्यांच्या आधारावर स्लॅब; निकृष्ट कामाच्या दर्जावर प्रश्नचिन्ह

 

गौरव शेलार / मुरबाड : मुरबाड नगरपंचायत हद्दीतील गणेश नगर–माळीपाडा परिसरातील प्रस्तावित आणि दीर्घकाळ प्रलंबित असलेला रस्ता मार्गी लागल्याने नागरिकांनी समाधान व्यक्त केले आहे. एखादे चांगले काम झाले की नागरिक त्याचे स्वागत करतात; मात्र कामाचा दर्जा निकृष्ट असल्याचे निदर्शनास आले की त्यावर प्रश्न उपस्थित होणेही स्वाभाविक आहे. सध्या याच परिसरात सुरू असलेल्या गटारीच्या कामावरून अशीच चर्चा सुरू झाली असून, बांधकामासाठी वापरण्यात येणाऱ्या पद्धतीमुळे कामाच्या गुणवत्तेबाबत गंभीर प्रश्न उपस्थित होत आहेत.

गणेश नगर–माळीपाडा रस्त्यालगत गटारीचे बांधकाम सुरू आहे. या गटारीवर स्लॅब टाकण्यासाठी तसेच बांधकामाला आधार देण्यासाठी चक्क बांबूच्या चिंब्यांचा वापर करण्यात आल्याचे छायाचित्रांवरून दिसून येत आहे. त्यामुळे नागरिकांमध्ये आश्चर्य व्यक्त केले जात असून, मुरबाडमध्ये विकासकामांसाठी ही नेमकी कोणती ‘नवीन टेक्नॉलॉजी’ वापरली जात आहे? असा उपरोधिक सवाल उपस्थित केला जात आहे.रस्त्याचे काम मार्गी लागल्याने आनंद व्यक्त करणाऱ्या नागरिकांना आता गटारीच्या कामाचा दर्जा पाहून चिंता वाटू लागली आहे. बांबूचा वापर काही बांधकामांमध्ये तात्पुरत्या आधारासाठी केला जात असला, तरी येथे त्याचा वापर नेमका कोणत्या अभियांत्रिकी निकषांनुसार करण्यात आला आहे, स्लॅबची मजबुती कशी सुनिश्चित केली जाणार आहे आणि कामासाठी आवश्यक तांत्रिक मानकांचे पालन होत आहे का, याची तपासणी होणे आवश्यक आहे.

मुरबाड नगरपंचायत क्षेत्रात विकासकामांसाठी निधी उपलब्ध करून देण्यासाठी लोकप्रतिनिधी प्रयत्न करत असतात. नागरिकांना दर्जेदार रस्ते, गटारी आणि मूलभूत सुविधा मिळाव्यात, हाच अशा निधीमागील मुख्य उद्देश असतो. मात्र, विकासकामांची अंमलबजावणी करताना गुणवत्तेकडे दुर्लक्ष होत असल्याची शंका निर्माण झाली, तर निधीच्या योग्य विनियोगाबाबतही प्रश्न उपस्थित होतात.विकासकामांसाठी निधी आणणे जितके महत्त्वाचे आहे, तितकेच त्या निधीतून होणारी कामे टिकाऊ, सुरक्षित आणि दर्जेदार असणेही गरजेचे आहे. ठेकेदाराने कामाच्या गुणवत्तेशी तडजोड केली असल्यास संबंधित यंत्रणेने त्याची गांभीर्याने दखल घेणे अपेक्षित आहे.

गणेश नगर–माळीपाडा येथील गटारीच्या बांधकामाची संबंधित अभियंत्यांकडून पाहणी करण्यात यावी, वापरण्यात येणाऱ्या आधारपद्धतीची तांत्रिक तपासणी व्हावी आणि बांधकाम निर्धारित निकषांनुसार होत आहे की नाही, हे स्पष्ट करण्यात यावे, अशी मागणी नागरिकांकडून होण्याची शक्यता आहे.

केवळ रस्ता तयार झाला म्हणजे विकासकाम पूर्ण झाले, असे म्हणता येणार नाही. रस्त्याच्या बाजूची गटारही सुरक्षित, मजबूत आणि दीर्घकाळ टिकणारी असणे आवश्यक आहे. त्यामुळे संबंधित ठेकेदाराने कामाच्या गुणवत्तेबाबत स्पष्टीकरण द्यावे आणि नगरपंचायत प्रशासनाने प्रत्यक्ष पाहणी करून आवश्यक ती कार्यवाही करावी, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे.आता प्रश्न एवढाच आहे की, मुरबाड नगरपंचायत प्रशासन या ‘बांबू टेक्नॉलॉजी’ची दखल घेऊन कामाच्या दर्जाची तपासणी करणार की नागरिकांनी प्रश्न उपस्थित केल्यानंतरही या कामाकडे दुर्लक्ष केले जाणार?

 

No comments