अश्वेश्वर कन्स्ट्रक्शनच्या कामावर प्रश्नचिन्ह! केदुरली पाड्यात ६५ लाखांच्या जलजीवन मिशनचा बोजवारा?
गौरव शेलार / मुरबाड : ग्रामीण भागातील नागरिकांना स्वच्छ आणि मुबलक
पिण्याचे पाणी उपलब्ध व्हावे, या उद्देशाने केंद्र सरकारच्या जलजीवन मिशन
योजनेची अंमलबजावणी करण्यात येत आहे. मात्र, मुरबाड
तालुक्यातील केदुर्ली आणि केदुर्लीपाडा येथे या
योजनेच्या कामावरून गंभीर प्रश्न उपस्थित झाले आहेत. २०२३ पासून मंजूर असलेली ही
योजना अद्याप पूर्ण क्षमतेने कार्यान्वित झाली नसल्याचा आरोप ग्रामस्थांनी केला
आहे. सुमारे ६४ ते ६५ लाख रुपये खर्चाच्या या योजनेचा लाभ प्रत्यक्षात नागरिकांना
मिळत नसल्याने संबंधित ठेकेदार आणि यंत्रणेच्या कार्यपद्धतीवर प्रश्नचिन्ह निर्माण
झाले आहे.
ग्रामस्थांच्या
म्हणण्यानुसार, संबंधित अश्वेश्वर
कन्स्ट्रक्शनने केलेल्या कामाच्या दर्जाबाबत अनेक तक्रारी आहेत. गावात नियमित आणि
स्वच्छ पाणीपुरवठा होत नसून, काही ग्रामस्थांना तब्बल १५
दिवसांच्या अंतराने पाणी मिळत असल्याचे सांगण्यात येत आहे. फिल्टरेशन प्रक्रिया
सुरू नसल्यामुळे पाणी शुद्धीकरणाचा प्रश्नही निर्माण झाला असून, दूषित पाणी प्यावे लागत असल्याची तक्रार ग्रामस्थांनी केली आहे. त्यामुळे
नागरिकांच्या आरोग्याबाबत चिंता व्यक्त होत आहे.
संबंधित
ठेकेदाराने ग्रामपंचायतीला नोटीस बजावून योजना पूर्ण झाल्याचे सांगत हस्तांतरण
करून घेण्याची भूमिका घेतल्याचे ग्रामस्थांकडून सांगण्यात आले. मात्र, प्रत्यक्ष काम अपूर्ण असल्याने सर्व कामे
पूर्ण झाल्याशिवाय योजना स्वीकारली जाणार नाही, अशी भूमिका
ग्रामपंचायतीने घेतल्याचा दावा करण्यात येत आहे.
योजनेची
सद्यस्थिती तपासण्यासाठी पंचनामा करण्यात आल्याची माहिती समोर आली आहे. या वेळी
संबंधित अधिकारी उपस्थित होते; मात्र ठेकेदार उपस्थित नसल्याचे ग्रामस्थांचे म्हणणे आहे. ठेकेदाराच्या अनुपस्थितीमुळे
ग्रामस्थांच्या मनातील शंका आणखी वाढल्याचे सांगितले जात आहे. या पंचनाम्यात
नेमक्या कोणत्या त्रुटी नोंदविण्यात आल्या, याबाबत अधिकृत
माहिती समोर येणे आवश्यक आहे.या योजनेतील विहिरीलगतच पंप आहे मात्र विद्युत
जोडणीला आवश्यक अर्थिंग नसल्याचेही तक्रारदारांचे म्हणणे आहे. त्यामुळे एखादी अनौपचारिक घटना घडू शकते हे नाकारता येणार नाही. ही बाब खरी असल्यास पाणीपुरवठा यंत्रणेच्या
सुरक्षिततेबाबत गंभीर प्रश्न निर्माण होऊ शकतो.
याशिवाय, पाण्याच्या टाकीला आवश्यक जोडण्या करण्यात आलेल्या नसल्याचा आणि गावात फिल्टर केलेले पाणी पोहोचत नसल्याचा आरोपही ग्रामस्थांनी केला आहे. त्यामुळे योजना कागदोपत्री पूर्ण दाखविण्यात आली आहे का, की प्रत्यक्षात तिची कामे अद्याप बाकी आहेत, याची निष्पक्ष चौकशी करण्याची मागणी जोर धरत आहे.जलजीवन मिशनसारख्या महत्त्वाकांक्षी योजनेतून ग्रामीण नागरिकांना स्वच्छ पाणी मिळणे अपेक्षित आहे. मात्र, योजनेची कामे अपूर्ण असतील, पाणी शुद्धीकरण प्रक्रिया सुरू नसेल आणि नियमित पाणीपुरवठा होत नसेल, तर योजनेच्या उद्देशालाच हरताळ फासला जात असल्याची भावना ग्रामस्थ व्यक्त करत आहेत.
संबंधित ठेकेदाराने केलेल्या कामाची गुणवत्ता, प्रत्यक्ष खर्च, पूर्णत्वाचा दाखला, पाणी शुद्धीकरण यंत्रणेची स्थिती आणि ग्रामपंचायतीकडे हस्तांतरणाची प्रक्रिया या सर्व बाबींची वरिष्ठ अधिकाऱ्यांमार्फत तपासणी करण्याची गरज आहे. तक्रारदारांनी कनिष्ठ स्तरावरील अधिकारी तक्रारींना समाधानकारक प्रतिसाद देत नसल्याचा आरोपही केला आहे. या आरोपांबाबत संबंधित अधिकाऱ्यांची भूमिका समोर येणे महत्त्वाचे ठरणार आहे.राज्यात अनेक भागांत पाणीटंचाईची परिस्थिती असल्याच्या पार्श्वभूमीवर मुरबाड तालुक्यातही पिण्याच्या पाण्याचा प्रश्न महत्त्वाचा बनला आहे. अशा परिस्थितीत लाखो रुपयांचा निधी खर्च होऊनही नागरिकांना नियमित आणि सुरक्षित पाणी मिळत नसेल, तर त्याची जबाबदारी निश्चित करणे आवश्यक आहे.
केदुर्लीतील जलजीवन मिशन योजनेची प्रत्यक्ष पाहणी करून अपूर्ण कामे पूर्ण करावीत, पाण्याच्या गुणवत्तेची प्रयोगशाळेत तपासणी करावी, विद्युत सुरक्षेतील त्रुटी दूर कराव्यात आणि दोष आढळल्यास संबंधितांवर नियमानुसार कारवाई करावी, अशी मागणी ग्रामस्थांकडून होत आहे.आता वरिष्ठ अधिकारी या प्रकरणाची दखल घेऊन योजनेची वस्तुस्थिती जनतेसमोर आणणार का? ६५ लाखांच्या आसपास खर्चाच्या या योजनेतून केदुरली पाड्यातील नागरिकांना स्वच्छ आणि नियमित पाणी कधी मिळणार, हा प्रश्न अद्याप अनुत्तरित आहे.



No comments