ठाणे जिल्हा दुष्काळग्रस्त घोषित करा! आरपीआय सेक्युलरची जिल्हाधिकाऱ्यांकडे मागणी
गौरव शेलार /
मुरबाड : ठाणे जिल्ह्यातील भिवंडी, शहापूर, मुरबाड, कल्याण आणि
अंबरनाथ या पाच तालुक्यांतील शेतकऱ्यांच्या शेतीची प्रत्यक्ष बांधावर जाऊन पाहणी
करावी, पीक नुकसानीचे पंचनामे करून बाधित शेतकऱ्यांना
तातडीने आर्थिक मदत द्यावी आणि ठाणे जिल्हा दुष्काळग्रस्त घोषित करण्यासाठी आवश्यक
कार्यवाही करावी, अशी जोरदार मागणी रिपब्लिकन पार्टी ऑफ
इंडिया (सेक्युलर), ठाणे जिल्ह्याच्या वतीने करण्यात आली
आहे. यासंदर्भात पक्षाचे जिल्हाध्यक्ष रविंद्र चंदने यांनी ठाणे जिल्हाधिकारी
श्रीकृष्ण पांचाळ यांना निवेदन सादर केले.
ठाणे
जिल्ह्यात पुरेसा पाऊस झाला असला, तरी अनियमित पर्जन्यवृष्टी आणि शेतीसाठी आवश्यक पाण्याची अनुपलब्धता
यामुळे अनेक भागांतील पिकांचे नुकसान झाल्याचे चित्र आहे. पिके करपल्याने
शेतकऱ्यांसमोर आर्थिक संकट उभे राहिले असून, केवळ कागदोपत्री
आढावा न घेता प्रशासनाने प्रत्यक्ष शेताच्या बांधावर जाऊन परिस्थितीची पाहणी करावी,
अशी भूमिका रविंद्र चंदने यांनी मांडली. नुकसानग्रस्त शेतकऱ्यांचे
तातडीने पंचनामे करून त्यांना दिलासा देण्याची गरजही त्यांनी अधोरेखित केली.
जिल्ह्यात
काही धरणांमध्ये पुरेसा पाणीसाठा असतानाही धरणालगतच्या गावांतील शेतकऱ्यांना
शेतीसाठी पाणी वापरण्याबाबत निर्बंधांचा सामना करावा लागत असल्याचा मुद्दा
निवेदनातून उपस्थित करण्यात आला आहे. विशेषतः बारवी धरणातील पाणी शेतीसाठी
वापरण्याबाबत एमआयडीसीकडून हरकत घेतली जात असल्याने आदिवासी शेतकऱ्यांना भाजीपाला
लागवड करताना अडचणी येत असल्याचे चंदने यांनी निदर्शनास आणून दिले.एकीकडे पाणीसाठा
उपलब्ध असताना दुसरीकडे शेतकऱ्यांना शेतीसाठी पाण्यापासून वंचित राहावे लागत असेल, तर या प्रश्नावर प्रशासनाने तातडीने तोडगा
काढणे आवश्यक आहे. आदिवासी शेतकऱ्यांना भाजीपाला लागवड आणि शेतीसाठी आवश्यक पाणी
वापरण्याची परवानगी मिळावी, अशी मागणीही करण्यात आली.
निवेदनाद्वारे
भिवंडी, शहापूर, मुरबाड, कल्याण आणि अंबरनाथ तालुक्यांतील शेतांची
प्रत्यक्ष पाहणी करणे, पीक नुकसानीचे पंचनामे करून बाधित
शेतकऱ्यांना तातडीने आर्थिक मदत देणे, जिल्ह्यातील
परिस्थितीचा सविस्तर आढावा घेऊन ठाणे जिल्हा दुष्काळग्रस्त घोषित करण्याबाबत
आवश्यक कार्यवाही करणे, तसेच धरणालगतच्या गावांतील
शेतकऱ्यांना शेतीसाठी पाणी उपलब्ध करून देण्याची मागणी करण्यात आली आहे. बारवी
धरणाच्या पाण्याच्या वापराबाबतच्या अडचणी दूर करून आदिवासी शेतकऱ्यांना भाजीपाला
लागवडीसाठी दिलासा देण्यावरही भर देण्यात आला.
या निवेदनाची जिल्हाधिकारी श्रीकृष्ण पांचाळ यांनी दखल घेत सकारात्मक प्रतिसाद दिला. निवेदनातील मागण्यांबाबत शासकीय स्तरावर दखल घेण्यात येईल, असे आश्वासन त्यांनी दिल्याची माहिती पक्षाच्या वतीने देण्यात आली.यावेळी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (सेक्युलर), ठाणे जिल्ह्याचे सरचिटणीस ॲड. सुजित जाधव आणि संदीप पाटील उपस्थित होते.
शेतकऱ्यांच्या नुकसानीची प्रत्यक्ष पाहणी करून मदतीचा निर्णय तातडीने घ्यावा, पाण्याअभावी शेती अडचणीत सापडलेल्या शेतकऱ्यांना दिलासा द्यावा आणि ठाणे जिल्ह्यातील दुष्काळसदृश परिस्थितीचा गांभीर्याने विचार करावा, अशी मागणी आरपीआय सेक्युलरच्या वतीने करण्यात आली आहे.



No comments