web-banner-lshep2024

Breaking News

मुरबाडच्या उमरोली खुर्दमध्ये अवैध रेती उपशा सुरूच! महसूल बुडविल्याप्रकरणी मंडळ अधिकारी, तलाठ्यावर कारवाईची मागणी

नामदेव शेलार / मुरबाड : मुरबाड तालुक्यातील उमरोली खुर्द गावातील डोईफोडी नदीपात्रातून मोठ्या प्रमाणात अवैध रेती उपसा सुरू असल्याचा गंभीर आरोप करण्यात आला आहे. गेल्या दोन महिन्यांपासून नदीपात्रात बेकायदेशीररीत्या वाळू उपसा सुरूच आहे.यामुळे शासनाचा लाखो रुपयांचा महसूल बुडत आहे. मुरबाड तहसीलदारांकडे तक्रार करून संबंधित मंडळ अधिकारी व तलाठ्यांची चौकशी करून दोषींवर कायदेशीर कारवाई करण्याची मागणी केली जात आहे.

उमरोली खुर्द गावातील डोईफोडी नदीपात्रात मोठ्या प्रमाणावर रेती उपसा होत असल्याची बाब संबंधित महसूल यंत्रणेच्या निदर्शनास आणून देऊनही प्रभावी कारवाई होत नसल्याचा आरोप आहे. या कथित प्रकारामुळे शासनाच्या महसुलाचे मोठे नुकसान होत असल्याचे त्यांनी म्हटले आहे.

नदीपात्रातून होणाऱ्या अवैध रेती उपशावर नियंत्रण ठेवण्याची जबाबदारी संबंधित महसूल अधिकाऱ्यांची असताना, हा प्रकार सुरूच कसा राहिला, असा सवाल तक्रारदाराने उपस्थित केला आहे. या प्रकरणात मंडळ अधिकारी आणि संबंधित तलाठी यांच्या भूमिकेची सखोल चौकशी करण्यात यावी, अशी मागणीही करण्यात आली आहे.तक्रारीत संबंधित अधिकारी व वाळू माफिया यांच्यात आर्थिक साटेलोटे असल्याचाही आरोप करण्यात आला आहे. मात्र, या आरोपांची स्वतंत्र चौकशी होऊनच वस्तुस्थिती स्पष्ट होणे आवश्यक आहे.

उमरोली खुर्द येथील नदीपात्रातील कथित अवैध रेती उपशाची प्रत्यक्ष पाहणी करावी, पंचनामा करून शासनाच्या महसुलाचे झालेले नुकसान निश्चित करावे आणि दोषी आढळणाऱ्यांवर नियमानुसार कठोर कायदेशीर कारवाई करावी, अशी मागणी तहसीलदारांकडेतेथील ग्रामस्थानी केली आहे.

मुरबाड तालुक्यातील नदीपात्रांमधून होणाऱ्या रेती उपशावर नियंत्रण ठेवणे आणि शासनाच्या महसुलाचे संरक्षण करणे ही प्रशासनाची महत्त्वाची जबाबदारी आहे. त्यामुळे उमरोली खुर्द येथील तक्रारीची दखल घेऊन प्रत्यक्ष तपासणी केली जाणार का? कथित अवैध उपशामागील जबाबदार व्यक्तींची चौकशी होणार का आणि महसूल बुडविल्याचे निष्पन्न झाल्यास कोणती कारवाई केली जाणार, याकडे आता नागरिकांचे लक्ष लागले आहे.

तक्रारीतील आरोपांची निष्पक्ष चौकशी करून वस्तुस्थिती जनतेसमोर आणणे आणि शासनाच्या महसुलाचे नुकसान होत असल्यास त्याला जबाबदार असणाऱ्यांवर कारवाई करणे, हे आता महसूल प्रशासनासमोरील प्रमुख आव्हान ठरणार आहे.

No comments