web-banner-lshep2024

Breaking News

मुरबाडमध्ये सायबर सुरक्षा मोहिमेला वेग; सार्वजनिक ठिकाणी जनजागृती पोस्टर

 

गौरव शेलार / मुरबाड : ठाणे ग्रामीण पोलीस अधीक्षक डॉ. विनय कुमार राठोड यांच्या नेतृत्वाखाली व मार्गदर्शनाखाली मुरबाड पोलीस ठाण्याच्या वतीने सायबर फसवणुकीबाबत नागरिकांमध्ये जनजागृती करण्यासाठी विशेष सायबर सुरक्षा मोहीम राबविण्यात येत आहे.

सायबर गुन्हेगारांकडून विविध प्रकारे नागरिकांची आर्थिक फसवणूक केली जात असल्याच्या पार्श्वभूमीवर मुरबाड पोलीस ठाण्याने नागरिकांना सतर्क राहण्याचे आवाहन केले आहे. अनोळखी व्यक्तींकडून येणारे फोन, संशयास्पद लिंक, बनावट मेसेज, ओटीपी, बँक खात्याची माहिती किंवा अन्य गोपनीय माहिती मागणाऱ्या व्यक्तींपासून सावध राहण्याचा संदेश या मोहिमेतून देण्यात येत आहे.

मुरबाड पोलीस ठाण्याच्या वतीने मुरबाड बस स्टॉप, शाळा, महाविद्यालये तसेच विविध सार्वजनिक ठिकाणी सायबर सुरक्षा जनजागृती करणारे पोस्टर लावण्यात आले आहेत. या माध्यमातून नागरिकांना सायबर फसवणुकीपासून स्वतःचा बचाव कसा करावा, याबाबत माहिती देण्यात येत आहे.

दरम्यान, सायबर फसवणूक झाल्यास घाबरून न जाता तातडीने संबंधित यंत्रणेशी संपर्क साधणे महत्त्वाचे असल्याचे पोलिसांकडून सांगण्यात येत आहे. फसवणुकीतील रक्कम परत मिळवण्यासाठी वेळ न दवडता तात्काळ तक्रार नोंदविण्याची प्रक्रिया सुरू करावी, असे आवाहनही मुरबाड पोलिसांनी केले आहे.सायबर गुन्हे रोखण्यासाठी केवळ पोलिसांची कारवाई पुरेशी नसून नागरिकांची जागरूकताही तितकीच महत्त्वाची आहे. त्यामुळे “सावध राहा, सुरक्षित राहा आणि सायबर फसवणुकीला बळी पडू नका” असा संदेश मुरबाड पोलीस ठाण्याच्या या जनजागृती मोहिमेतून देण्यात येत आहे.

 

No comments