web-banner-lshep2024

Breaking News

दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांसाठी कपिल पाटील फाउंडेशनचा मदतीचा हात; नवरात्र उत्सवाचा खर्च कमी करून ११ लाखांची मदत

 

गौरव शेलार / भिवंडी : दुष्काळाच्या संकटाला सामोरे जाणाऱ्या शेतकऱ्यांच्या मदतीसाठी कपिल पाटील फाउंडेशनने सामाजिक बांधिलकी जपत मदतीचा हात पुढे केला आहे. नवरात्र उत्सवावरील खर्चात कपात करून फाउंडेशनच्या वतीने दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांसाठी तब्बल ११ लाख रुपयांची मदत जाहीर करण्यात आली आहे.

याबाबतची माहिती माजी केंद्रीय राज्यमंत्री कपिल पाटील यांनी दिली. दुष्काळामुळे शेतकरी आणि ग्रामीण भागातील नागरिकांसमोर निर्माण झालेल्या आर्थिक अडचणी लक्षात घेऊन ही मदत करण्यात येत असल्याचे त्यांनी सांगितले.

दरम्यान, या सामाजिक उपक्रमाला नागरिकांकडूनही प्रतिसाद मिळत असून अप्पर ठाणे परिसरातील रहिवाशांकडून दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांसाठी आणखी ५ लाख रुपयांची मदत करण्यात येणार आहे. त्यामुळे दुष्काळाच्या संकटात शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी एकूण मदतीचा हात आणखी बळकट होणार आहे.

या वेळी कपिल पाटील फाउंडेशनचे अध्यक्ष सुमित पाटील, कपिल पाटील यांचे स्वीय सहाय्यक राम माळी तसेच फाउंडेशनचे अन्य पदाधिकारी उपस्थित होते.नवरात्रोत्सवाचा खर्च कमी करून तोच निधी दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांच्या मदतीसाठी देण्याचा निर्णय घेण्यात आल्याने या उपक्रमातून “उत्सवाबरोबर सामाजिक बांधिलकी” जपण्याचा संदेश देण्यात आला आहे.

दुष्काळग्रस्त भागातील शेतकऱ्यांना शासनाच्या मदतीसोबतच सामाजिक संस्था, संघटना आणि नागरिकांकडूनही मदतीचा हात मिळाल्यास संकटाच्या काळात त्यांना मोठा आधार मिळू शकतो. कपिल पाटील फाउंडेशनच्या या निर्णयामुळे दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांसाठी मदतीची नवी दिशा निर्माण होण्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे.

 

No comments