web-banner-lshep2024

Breaking News

“मुरबाड एमआयडीसीत झाडांवर कुऱ्हाड! बंद बलदेव कंपनीत शेकडो वृक्षांची कत्तल; प्रशासन झोपेत?”

 

गौरव शेलार / मुरबाड : मुरबाड एमआयडीसी परिसरातील तहसील कार्यालयालगत असलेल्या बंद बलदेव कंपनीच्या जागेत शेकडो झाडांची तोड सुरू असल्याचा प्रकार समोर आला आहे. संबंधित कंपनीच्या जागेवर रीडेव्हलपमेंटच्या अनुषंगाने काम सुरू असल्याचे सांगितले जात असून, या कामादरम्यान जुन्या आणि मोठ्या झाडांवर कुऱ्हाड चालवली जात असल्याचा आरोप स्थानिकांकडून केला जात आहे.

विशेष म्हणजे, आज रविवार असल्याने शासकीय कार्यालयांना सुट्टी असतानाच वृक्षतोड सुरू असल्याचे चित्र दिसून येत आहे. त्यामुळे शासकीय यंत्रणेच्या अनुपस्थितीचा फायदा घेत वृक्षतोड केली जात आहे का, असा सवाल उपस्थित होत आहे.

या परिसरातील अनेक झाडे जुनी व मोठ्या आकाराची असल्याचे स्थानिकांचे म्हणणे आहे. विकासकामाच्या नावाखाली ही झाडे नष्ट केली जात असतील, तर संबंधित कामासाठी आवश्यक परवानग्या घेण्यात आल्या आहेत का? वृक्षतोडीसाठी सक्षम प्राधिकरणाची मंजुरी आहे का? याची प्रशासनाने तातडीने चौकशी करण्याची गरज निर्माण झाली आहे.

एकीकडे शासनाकडून ‘झाडे लावा, झाडे जगवा’ असा संदेश देत पर्यावरण संवर्धनासाठी जनजागृती केली जाते. मात्र दुसरीकडे मुरबाड एमआयडीसी परिसरात शेकडो झाडे तोडली जात असल्याचे चित्र समोर येत असल्याने शासनाच्या पर्यावरण संवर्धनाच्या भूमिकेवरच प्रश्नचिन्ह निर्माण होत आहे.

दरम्यान, या वृक्षतोडीमागे संबंधित कंपनीचे चालक-मालक किंवा इतर कोणाची भूमिका आहे का, याबाबत अधिकृत माहिती अद्याप समोर आलेली नाही. त्यामुळे प्रशासनाने घटनास्थळी पाहणी करून वृक्षतोडीची परवानगी, संबंधित कागदपत्रे आणि पर्यावरणीय नियमांचे पालन झाले आहे का, याची तपासणी करणे आवश्यक ठरणार आहे.

आता या प्रकरणाची दखल घेऊन संबंधित अधिकारी वृक्षतोड थांबवतात का, चौकशी करतात का आणि नियमांचे उल्लंघन आढळल्यास कारवाई करतात का, याकडे मुरबाडकरांचे लक्ष लागले आहे.

 

No comments