web-banner-lshep2024

Breaking News

आतकोली पठार भूमाफियांच्या कब्जात? 100 फूट खोल दगडखाणींमुळे भूस्खलनाचा धोका; लाखोंच्या हप्त्याच्या आरोपाने खळबळ

 

भिवंडी : भिवंडी तालुक्यातील आतकोली पठार परिसरात कथित बेकायदा उत्खनन, जमीन बळकावणे आणि बांधकामांच्या माध्यमातून भूमाफियांनी आपला पाय रोवला असल्याचा गंभीर आरोप स्थानिक शेतकऱ्यांकडून करण्यात आला आहे. या कथित प्रकारांमुळे परिसरातील शेतकरी आणि नागरिकांमध्ये संतापाचे वातावरण निर्माण झाले असून, प्रशासनाच्या भूमिकेवरही गंभीर प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहे.

आतकोली पठार परिसरात नियमबाह्य पद्धतीने तब्बल 100 फूट खोल दगडखाणी आणि मोठ्या दऱ्या निर्माण करण्यात आल्याचा आरोप करण्यात आला आहे. कोणत्याही प्रकारची अधिकृत मोजणी न करता दगडखाणी सुरू असल्याचा दावा शेतकऱ्यांनी केला आहे. मौजे भादाणे येथील सर्व्हे क्रमांक 172/1क ही जमीन कुळ कायद्यांतर्गत असल्याचे सांगत, या जमिनीबाबत महसूल विभागातील अधिकाऱ्यांनी कथितरीत्या चुकीचा सातबारा तयार करून त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात दगडखाणी सुरू करण्यास मार्ग मोकळा करून दिल्याचा आरोपही करण्यात आला आहे.

या कथित उत्खननामुळे शासनाच्या कोट्यवधी रुपयांच्या रॉयल्टीचे नुकसान झाल्याचा दावा शेतकऱ्यांनी केला आहे. तसेच संबंधित शेतकऱ्यांच्या जमिनीमधून मोठ्या प्रमाणात दगड आणि मातीचे उत्खनन करून कोट्यवधी रुपयांचा माल बाहेर काढण्यात आल्याचा आरोप आहे. या प्रकाराला विरोध करणाऱ्या शेतकऱ्यांवर दहशतीचे वातावरण निर्माण केले जात असल्याचेही शेतकऱ्यांचे म्हणणे आहे.

विशेष म्हणजे, या जमिनीबाबत न्यायालयीन वाद सुरू असल्याचे सांगण्यात येत आहे. असे असतानाही जिल्हाधिकारी, तहसीलदार, मंडळ अधिकारी आणि तलाठी स्तरावरून अपेक्षित कारवाई होत नसल्याचा आरोप स्थानिकांनी केला आहे. प्रशासनाचे अधिकारी घटनास्थळी पाहणी करण्यासाठी आल्यानंतर जेसीबी, पोकलेन आणि डंपर घटनास्थळावरून हटवले जातात आणि त्यानंतर केवळ थातूरमातूर कारवाई केली जाते, असा आरोपही करण्यात आला आहे.

या संपूर्ण प्रकरणात संबंधित अधिकाऱ्यांना लाखो रुपयांचा हप्ता दिला जात असल्याचे गंभीर आरोप स्थानिकांकडून करण्यात आले आहेत. त्यांची स्वतंत्र आणि निष्पक्ष चौकशी होणे आवश्यक आहे.

दरम्यान, पठार परिसरात मोठ्या प्रमाणात उत्खननामुळे जमिनीचा नैसर्गिक समतोल बिघडला असून, भविष्यात भूस्खलनाचा गंभीर धोका निर्माण होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. शेतीकडे जाण्यासाठी योग्य रस्ता नसताना मोठ्या प्रमाणात उत्खनन सुरू असल्याचा आरोप आहे. तसेच हजारो किलो स्फोटकांचा वापर केला जात असल्याचा आणि स्फोटांचे मोठे आवाज परिसरात ऐकू येत असल्याचा दावाही स्थानिक शेतकऱ्यांनी केला आहे.

एकीकडे दगड-मातीचे कथित उत्खनन सुरू असताना दुसरीकडे जमीन विकसित करण्याचे प्रकारही सुरू असल्याचा आरोप करण्यात आला आहे. त्यामुळे आतकोली पठार परिसरातील शेतजमिनी, डोंगर-पठार आणि पर्यावरणाच्या भवितव्याबाबतही प्रश्न उपस्थित झाले आहेत.‘भादाणे येथील खाजगी जमिनीवर सरकारी मोजणी न करता दगडखाणी सुरू करण्यास परवानगी कोणी दिली?’ असा थेट सवाल शेतकऱ्यांनी उपस्थित केला आहे. महसूल विभागाने या प्रकरणात कोणावर आणि काय कारवाई केली, याची माहिती सार्वजनिक करावी, अशी मागणीही करण्यात आली आहे.

या कथित उत्खननामुळे ज्या शेतकऱ्यांच्या जमिनींचे नुकसान झाले आहे, त्यांना शासनाने योग्य ती भरपाई द्यावी, अशी मागणी शेतकऱ्यांनी केली आहे. तसेच महसूल मंत्री आणि जिल्हा प्रशासनाने या संपूर्ण प्रकरणाची गंभीर दखल घेऊन प्रत्यक्ष पाहणी करावी, दोषी आढळणाऱ्यांवर कारवाई करावी आणि उत्खननातून झालेल्या नुकसानीची चौकशी करावी, अशी मागणी होत आहे.

कारवाई न झाल्यास मुख्यमंत्री यांच्या दालनासमोर आंदोलन करण्याबरोबरच न्यायालयात दाद मागण्याचा इशारा शेतकऱ्यांनी दिला आहे.दरम्यान, आतकोली पठारावरील कथित गैरप्रकारांची चौकशी कधी होणार? बेकायदा उत्खननाला परवानगी कोणी दिली? शासनाच्या रॉयल्टीचे नुकसान झाले असल्यास त्याची जबाबदारी कोणाची? आणि संबंधित अधिकाऱ्यांनी यापूर्वी कोणती कारवाई केली? या प्रश्नांची उत्तरे आता जिल्हा प्रशासन आणि महसूल विभागाकडून अपेक्षित आहेत.आतकोली पठारावरील कथित गैरप्रकारांची निष्पक्ष चौकशी होऊन जबाबदारांवर कारवाई कधी होणार, याकडे आता परिसरातील नागरिक आणि शेतकऱ्यांचे लक्ष लागले आहे.

 

No comments