web-banner-lshep2024

Breaking News

ठाणे पोलिसांची पोलखोल? सुषमा अंधारेंचा घणाघाती हल्ला; ‘पाच कोटींच्या सुपारी’पासून अधिकाऱ्यांच्या नियुक्त्यांपर्यंत सवाल! कोण आहेत ते अधिकारी? पाहा!

 

गौरव शेलार / ठाणे : शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाच्या नेत्या सुषमा अंधारे यांनी आज ठाण्यात प्रदीप पूर्णेकर यांच्या कुटुंबीयांची भेट घेऊन सांत्वन केले. त्यानंतर घेतलेल्या पत्रकार परिषदेत त्यांनी प्रदीप पूर्णेकर हत्या प्रकरणासह ठाणे पोलीस प्रशासनातील अधिकाऱ्यांच्या नियुक्त्या, पदोन्नती आणि कार्यकाळाबाबत गंभीर प्रश्न उपस्थित केले. पूर्णेकर यांच्या हत्येसाठी पाच कोटी रुपयांची सुपारी दिल्याची माहिती मिळाल्याचा दावा अंधारे यांनी केला. या दाव्याची स्वतंत्र अधिकृत पुष्टी अद्याप झालेली नाही.

अंधारे यांनी पत्रकार परिषदेत वरिष्ठ पोलीस निरीक्षकांच्या एका पोलीस ठाण्यातील कार्यकाळाचा मुद्दा उपस्थित केला. त्यांच्या म्हणण्यानुसार, वरिष्ठ पोलीस निरीक्षकांचा साधारण कार्यकाळ तीन वर्षांचा असतो. मात्र, सचिन गायकवाड हे मागील पाच वर्षांपासून गुन्हे शाखेत कार्यरत असल्याचा दावा त्यांनी केला.

यासोबतच गोरखनाथ घारगे, वरिष्ठ पोलीस निरीक्षक, गुन्हे शाखा वागळे युनिट; मंजुषा भोंगळे, वरिष्ठ पोलीस निरीक्षक, कापूरबावडी; मंगेश बोरसे, वरिष्ठ पोलीस निरीक्षक, कोनगाव पोलीस ठाणे; तसेच प्रफुल्ल जाधव, वरिष्ठ पोलीस निरीक्षक, सेंट्रल युनिट यांच्या नियुक्त्यांबाबतही अंधारे यांनी प्रश्न उपस्थित केले.

विशेषतः मंगेश बोरसे यांच्या नियुक्तीबाबत अंधारे यांनी गंभीर आक्षेप नोंदवला. ठाणे पोलीस आयुक्तालयातील सिनियरिटीच्या मुद्द्यावर प्रश्न उपस्थित करत, इतर वरिष्ठ अधिकाऱ्यांना डावलून त्यांना बढती देण्यात आल्याचा दावा त्यांनी केला. या बढती व नियुक्त्या कोणत्या नियमांनुसार करण्यात आल्या, असा सवालही त्यांनी उपस्थित केला.

‘ACP प्रमोशन नाकारले, तरी गुन्हे शाखेत महत्त्वाच्या नियुक्त्या?’

अंधारे यांनी काही पोलीस अधिकाऱ्यांनी एसीपी पदोन्नती नाकारल्याचा मुद्दाही पत्रकार परिषदेत उपस्थित केला. नियमाप्रमाणे अशा अधिकाऱ्यांना अकार्यकारी शाखेत नियुक्त करणे अपेक्षित असल्याचा दावा करत, प्रत्यक्षात त्यांना गुन्हे शाखेत वरिष्ठ पोलीस निरीक्षक म्हणून महत्त्वाच्या जबाबदाऱ्या देण्यात आल्याचे त्यांनी म्हटले.

यामध्ये अनिल शिंदे, वरिष्ठ पोलीस निरीक्षक, गुन्हे शाखा युनिट-१; शितल राऊत, वरिष्ठ पोलीस निरीक्षक, गुन्हे शाखा युनिट-२, भिवंडी; तसेच शैलेश साळवी, वरिष्ठ पोलीस निरीक्षक, खंडणी विरोधी पथक यांचा त्यांनी उल्लेख केला.या नियुक्त्या नेमक्या कोणत्या नियमांनुसार झाल्या? संबंधित अधिकाऱ्यांना महत्त्वाच्या ठिकाणी नियुक्त्या देण्यामागे कोणाचा वरदहस्त आहे? असा थेट सवाल अंधारे यांनी उपस्थित केला.

‘फक्त पोलीस आयुक्तांच्या जवळचे म्हणून महत्त्वाच्या ठिकाणी नियुक्ती?’

“फक्त पोलीस आयुक्तांचे हिडर आहेत म्हणून महत्त्वाच्या ठिकाणी नेमणूक केली जाते का?” असा सवाल उपस्थित करत अंधारे यांनी पोलीस प्रशासनाच्या कार्यपद्धतीवरच प्रश्नचिन्ह उपस्थित केले.

या अधिकाऱ्यांच्या पदोन्नती नियमानुसार झाल्या आहेत का, त्यांच्या नियुक्त्यांमध्ये प्रशासकीय नियमांचे पालन झाले आहे का आणि काही अधिकारी पाच-सहा वर्षे एकाच ठिकाणी कसे कार्यरत राहतात, याची चौकशी होण्याची गरज असल्याचे त्यांनी म्हटले.

पूर्णेकर हत्या प्रकरणाच्या पार्श्वभूमीवर पोलिसांच्या कार्यक्षमतेवरही त्यांनी सवाल उपस्थित केला. गंभीर गुन्ह्यातील आरोपींवर कारवाई करण्याबाबत पोलिसांकडून कठोर भूमिका अपेक्षित असताना, काही अधिकारी कारवाई करण्यास धजावत नसल्याचा आरोप त्यांनी केला.

‘ठाण्यात कोणाच्या आशीर्वादाने अधिकारी ठाण मांडून?’

ठाणे पोलीस आयुक्तालयातील काही अधिकारी दीर्घकाळ एकाच ठिकाणी कार्यरत असल्याचा मुद्दा उपस्थित करत, हे अधिकारी नेमके कोणाच्या आशीर्वादाने ठाण्यात ठाण मांडून आहेत, असा सवाल सुषमा अंधारे यांनी केला.प्रदीप पूर्णेकर हत्या प्रकरणाच्या तपासात कोणत्याही प्रकारचा राजकीय किंवा प्रशासकीय दबाव असू नये, तसेच या प्रकरणातील सर्व पैलूंची निष्पक्ष चौकशी व्हावी, अशी मागणी त्यांनी केली.

दरम्यान, पोलिसांनी या हत्या प्रकरणात आतापर्यंत तीन आरोपींना अटक केली असून आणखी आरोपींचा शोध सुरू असल्याचे वृत्त आहे. तपासासाठी विशेष तपास पथकाची स्थापना करण्यात आली आहे.सुषमा अंधारे यांनी पत्रकार परिषदेत केलेले आरोप आणि उपस्थित केलेले प्रश्न यामुळे प्रदीप पूर्णेकर हत्या प्रकरणासोबतच ठाणे पोलीस प्रशासनातील अधिकारी नियुक्त्या आणि पदोन्नतीचा मुद्दाही चर्चेत आला आहे. या आरोपांबाबत संबंधित पोलीस प्रशासनाची अधिकृत भूमिका समोर येणे महत्त्वाचे ठरणार आहे.

 

No comments