“शाळा पाडली, विद्यार्थी समाज हॉलमध्ये; कोट्यवधींच्या बांधकामात ठेकेदाराचा ‘खेळ’?”
गौरव
शेलार / मुरबाड : मुरबाड शहरातील जिल्हा परिषद शाळांच्या जागा आणि त्यांच्या
वापरावरून वाद निर्माण झाला असतानाच आता प्रभाग क्रमांक २ मधील लांबाची वाडी येथील
जिल्हा परिषद शाळेच्या इमारतीच्या पाडकाम आणि नव्या बांधकामावरून प्रश्नचिन्ह
निर्माण झाले आहे. जुनी शाळा पाडून त्या ठिकाणी नगरोत्थान विभागाच्या निधीतून नव्याने
बांधकाम सुरू करण्यात आले असून, या कामाच्या प्रक्रियेत पारदर्शकता राखली जात आहे का, असा सवाल नागरिकांकडून उपस्थित केला जात आहे.
लांबाची
वाडी येथील जिल्हा परिषद शाळेची जुनी इमारत जीर्ण झाल्याने ती पाडून नव्याने
बांधकाम करण्यासाठी जिल्हा परिषद आणि शिक्षण विभागाची रितसर परवानगी घेण्यात
आल्याचे प्रशासनाकडून सांगण्यात आले आहे. मात्र,
कोट्यवधी रुपयांच्या या बांधकामात नेमका किती निधी मंजूर झाला,
कामाची निविदा कोणाला मिळाली, कामाचा दर्जा
काय आहे आणि प्रत्यक्ष खर्च किती होणार आहे, याची माहिती
सार्वजनिक करण्यात आली आहे का? असे प्रश्न नागरिक उपस्थित
करत आहेत.
विद्यार्थ्यांचे शिक्षण समाज हॉलमध्ये
शाळेची
जुनी इमारत पाडण्यात आल्यानंतर सध्या विद्यार्थ्यांना समाज हॉलमध्ये बसवून शिक्षण
दिले जात आहे. शाळेची नवीन इमारत लवकरात लवकर पूर्ण करून विद्यार्थ्यांना योग्य
शैक्षणिक वातावरण उपलब्ध करून द्यावे, अशी मागणी पालकांकडून होत आहे.
दरम्यान, जिल्हा परिषद शाळांच्या दुरुस्ती आणि
पुनर्बांधणीसाठी शासनाकडून निधी उपलब्ध होत असताना, या
कामाची अंमलबजावणी करताना स्थानिक पातळीवर कोणती प्रक्रिया राबविण्यात आली,
याबाबतही नागरिकांमध्ये चर्चा सुरू आहे.
‘ठेकेदाराला फायदा करून देण्यासाठी तर घाई नाही
ना?’
शाळेच्या
बांधकामाच्या निमित्ताने ठेकेदाराला फायदा करून देण्यासाठी नियम डावलले जात आहेत
का? असा संशय काही
नागरिकांकडून व्यक्त केला जात आहे. मात्र, या आरोपांची
अधिकृत पुष्टी झालेली नाही. त्यामुळे बांधकामाची निविदा प्रक्रिया, अंदाजपत्रक, मंजूर निधी, कामाचा
आदेश, प्रत्यक्ष प्रगती आणि खर्च याबाबत प्रशासनाने स्पष्ट
माहिती जाहीर करण्याची मागणी होत आहे.
विशेष
म्हणजे, यापूर्वी मुरबाड
शहरातील मध्यवर्ती भागातील जिल्हा परिषद शाळेची जागा आणि त्या ठिकाणी झालेल्या
विकासकामावरूनही प्रश्न उपस्थित झाले होते. त्या पार्श्वभूमीवर आता लांबाची
वाडीतील शाळेच्या कामामुळे ‘शाळा वाचवण्यापेक्षा शाळेच्या
जागेवर विकासकामांना प्राधान्य का?’ असा सवाल उपस्थित होत
आहे.
प्रशासनाचे म्हणणे काय?
मुरबाड नगरपंचायतीचे मुख्याधिकारी मनोज म्हसे यांनी सांगितले की, लांबाची वाडी येथील शाळेची जुनी इमारत जीर्ण झाली होती. ती पाडून नव्याने बांधकाम करण्यासाठी जिल्हा परिषदेची रितसर परवानगी घेण्यात आली असून, नगरोत्थान विभागाच्या निधीतून बांधकाम सुरू आहे.तर मुरबाडचे गटशिक्षणाधिकारी मधुकर घोरड यांनी लांबाची वाडी येथील शाळेच्या नव्या बांधकामासाठी शिक्षणाधिकारी (ठाणे) यांच्याकडून रितसर परवानगी देण्यात आल्याचे स्पष्ट केले आहे.
मात्र, परवानगी मिळाली असली तरी कोट्यवधींच्या
सार्वजनिक निधीतून होणाऱ्या बांधकामाचा दर्जा, खर्च आणि
ठेकेदाराची कामगिरी याची पारदर्शक तपासणी होणार का? हा
प्रश्न आता नागरिकांकडून उपस्थित केला जात आहे. संबंधित कागदपत्रे सार्वजनिक करून
बांधकामाची स्वतंत्र पाहणी करण्यात यावी, अशी मागणी जोर धरत
आहे.शाळा विद्यार्थ्यांसाठी असते; तिच्या नावावर निधी खर्च
होऊनही विद्यार्थी जर समाज हॉलमध्ये बसून शिक्षण घेत असतील, तर
या विकासकामाचा नेमका फायदा कोणाला होत आहे, याचे उत्तर
प्रशासनाने देणे गरजेचे आहे.



No comments