web-banner-lshep2024

Breaking News

मुरबाडमध्ये सर्वात मोठी १२ लाखांची दहीहंडी उत्साहात साजरी

 

नामदेव शेलार / मुरबाड : मुरबाड शहरात यंदाची सर्वात मोठी १२ लाख रुपयांची दहीहंडी उत्साहपूर्ण आणि जल्लोषाच्या वातावरणात साजरी करण्यात आली. स्व. आनंद दिघे प्रतिष्ठानचे मुरबाड तालुका शिवसेना प्रमुख तथा नगरसेवक रामभाऊ दुधाळे यांच्या पुढाकाराने खुले नाट्यगृह येथे या दहीहंडी उत्सवाचे आयोजन करण्यात आले होते.

या कार्यक्रमाच्या व्यासपीठावर शिवसेना नेते अरविंद मोरे यांची प्रमुख उपस्थिती होती. शहरातील तसेच परिसरातील विविध गोविंदा पथकांनी दहीहंडीला सलामी देत उत्सवाची रंगत वाढवली. यावेळी विविध मनोरंजनात्मक कार्यक्रमांचेही आयोजन करण्यात आले होते. सलामी देणाऱ्या गोविंदा पथकांना मान्यवरांच्या हस्ते पारितोषिके देऊन गौरविण्यात आले.

दरम्यान, महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे शहराध्यक्ष देवेंद्र जाधव यांच्या पुढाकाराने नगरपंचायत कार्यालयासमोर ३३ हजार ३३३ रुपयांचे बक्षीस असलेल्या दहीहंडीचे आयोजन करण्यात आले होते. या दहीहंडीला विविध राजकीय, सामाजिक क्षेत्रातील मान्यवरांनी भेट देऊन आयोजकांना तसेच गोविंदा पथकांना शुभेच्छा दिल्या.

सकाळपासून सुरू झालेला दहीहंडी उत्सव सायंकाळी पाच वाजेपर्यंत मुरबाड शहरात उत्साहात सुरू होता. ढोल-ताशांचा गजर, गोविंदांचा जल्लोष आणि नागरिकांची मोठी उपस्थिती यामुळे संपूर्ण शहरात उत्सवी वातावरण निर्माण झाले होते.

मुरबाड शहरातील दहीहंडी उत्सव संपल्यानंतर येथील विविध गोविंदा पथकांनी कल्याण, बदलापूर, उल्हासनगर आणि ठाणे परिसरातील दहीहंडी उत्सवांमध्येही सहभाग घेतला. त्यामुळे मुरबाडच्या गोविंदांचा उत्साह आणि जल्लोष शहराबाहेरही पाहायला मिळाला.

 

No comments