दोन तासांत खूनप्रकरणाचा उलगडा; पोलीस आयुक्त विश्वास नागरे-पाटील यांच्याकडून पोलीस निरीक्षक विनायक गोल्हे व पथकाचा प्रशंसापत्र व रोख बक्षीस देऊन गौरव
गौरव शेलार / नागपूर : नागपूर
शहरातील भांडेवाडी परिसरात घडलेल्या थरारक हत्याकांडाचा अवघ्या दोन तासांत उलगडा
करून क्राईम ब्रँच युनिट-५ ने उल्लेखनीय कामगिरी बजावली. या धाडसी व जलद
तपासाबद्दल पोलीस आयुक्त विश्वास नागरे-पाटील यांनी पोलीस निरीक्षक विनायक गोल्हे
व त्यांच्या पथकाचा प्रशंसापत्र आणि रोख बक्षीस देऊन यथोचित सन्मान केला.
भांडेवाडी येथे राहणारा रेकॉर्डवरील सराईत गुन्हेगार गणेश बोरकर (वय ४०)
याची २
जुलै २०२६ रोजी रात्री सुमारे ८ वाजता तीन अज्ञात मारेकऱ्यांनी भर
चौकात निर्घृण हत्या केली होती. मारेकऱ्यांनी प्रथम गणेश बोरकर यांच्या डोळ्यात
मिरचीपूड फेकली आणि त्यानंतर चाकूने सपासप वार करून त्याचा खून केला. ही थरारक
घटना घडल्यानंतर आरोपी घटनास्थळावरून पसार झाले. या घटनेमुळे संपूर्ण परिसरात
भीतीचे वातावरण निर्माण झाले होते.
घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन क्राईम ब्रँच युनिट-५ चे
पोलीस निरीक्षक विनायक गोल्हे यांनी आपल्या पथकासह तातडीने
तपासाची सूत्रे हाती घेतली. घटनास्थळावरील पुरावे, तांत्रिक माहिती,
गुप्त माहितीदारांचे जाळे आणि वेगवान तपासाच्या आधारे पोलिसांनी
अवघ्या दोन
तासांत या हत्याकांडाचा छडा लावला.
तपासादरम्यान या खुनामागील मुख्य सूत्रधार ही मृतकाची
पत्नी मनीषा
बोरकर असल्याचे निष्पन्न झाले. तिने एका साथीदाराच्या मदतीने
मारेकऱ्यांना सुपारी देऊन पतीचा खून घडवून आणल्याचे उघड झाले. पोलिसांनी मनीषा
बोरकर व तिच्या साथीदाराला तातडीने अटक केली. तसेच या हत्येत सहभागी असलेल्या दोन विधीसंघर्षग्रस्त
बालकांना कामठी परिसरातून ताब्यात घेण्यात आले.
अत्यंत कमी वेळेत खुनाचा उलगडा करून आरोपींना जेरबंद
केल्याने परिसरातील नागरिकांमध्ये निर्माण झालेली भीती दूर झाली आणि
पोलिसांबद्दलचा विश्वास अधिक दृढ झाला. या उत्कृष्ट, वेगवान आणि परिणामकारक
तपासामुळे नागपूर पोलिसांची प्रतिमा उंचावली असून कायदा-सुव्यवस्था राखण्यासाठी
पोलिसांची तत्परता पुन्हा एकदा अधोरेखित झाली आहे.
या उल्लेखनीय कामगिरीची दखल घेत पोलीस आयुक्त
विश्वास नागरे-पाटील यांनी क्राईम ब्रँच युनिट-५ चे पोलीस निरीक्षक
विनायक गोल्हे व त्यांच्या पथकातील पोलीस अंमलदारांचा प्रशंसापत्र
व रोख बक्षीस देऊन सन्मान केला. त्यांच्या या कार्याचे पोलीस दलासह नागरिकांकडूनही
कौतुक होत आहे.



No comments