ट्रान्सफॉर्मर फोडून तांब्याच्या तारा चोरणारी सराईत टोळी मुरबाड पोलिसांच्या जाळ्यात; १२ गुन्ह्यांची उकल, ८.२० लाखांचा मुद्देमाल जप्त
गौरव शेलार / मुरबाड : मुरबाड पोलीस ठाण्याच्या हद्दीतील संगम गाव
परिसरात रस्त्यालगत असलेल्या ट्रान्सफॉर्मरचे झाकण तोडून त्यातील तांब्याच्या तारा
चोरी झाल्याप्रकरणी मुरबाड पोलिसांनी अत्यंत कौशल्याने तपास करत सराईत टोळीचा
पर्दाफाश केला आहे. या कारवाईत नरेश भाऊ मोरे (वय ३६), सूरज
अशोक पारधी (वय २०), किसन रामरूप कुमार (वय २५), निशांत मोहन सिंग (वय १८), राज गुलाबचंद यादव (वय
१९), सुनील रमेश पवार (वय २२), प्रशांत
प्रकाश वाघ (वय २०) यांना अटक करण्यात आली असून एका विधिसंघर्षग्रस्त बालकास
ताब्यात घेण्यात आले आहे. आरोपींकडून चोरीस गेलेल्या तांब्याच्या तारा, एक छोटा मालवाहू वाहन व चार मोटारसायकली असा एकूण ८ लाख २० हजार रुपयांचा
मुद्देमाल जप्त करण्यात आला असून ठाणे ग्रामीण व रायगड जिल्ह्यातील १२ गुन्ह्यांची
उकल करण्यात पोलिसांना यश आले आहे.
या
प्रकरणी रविंद्र काळूराम घुडे (वय ३३) यांनी मुरबाड पोलीस ठाण्यात दिलेल्या
फिर्यादीवरून गुन्हा रजिस्टर क्रमांक ३४१/२०२६ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला
होता. त्यानंतर उपविभागीय पोलीस अधिकारी अनिल लाड व मुरबाड पोलीस ठाण्याचे पोलीस
निरीक्षक सचिन हुंदळेकर यांच्या मार्गदर्शनाखाली तपास सुरू करण्यात आला. गोपनीय
माहितीच्या आधारे प्रथम सुनील रमेश पवार व प्रशांत प्रकाश वाघ यांना ताब्यात
घेण्यात आले. त्यांच्या चौकशीतून मुख्य आरोपी नरेश भाऊ मोरे याच्यासह सूरज अशोक
पारधी, किसन रामरूप कुमार,
निशांत मोहन सिंग, राज गुलाबचंद यादव तसेच एका
विधिसंघर्षग्रस्त बालकाचा सहभाग निष्पन्न झाला. आरोपींनी मुरबाड, कल्याण तालुका, शाहापूर, वाशिंद,
कसारा, किन्हवली, टोकावडे
तसेच रायगड जिल्ह्यातील नेरळ व खालापूर परिसरातील चोरीचे गुन्हे केल्याची कबुली
दिली असून या कारवाईत एकूण १२ गुन्ह्यांचा छडा लावण्यात आला.
पोलीस
अधीक्षक डॉ. विनायकुमार राठोड, अपर पोलीस अधीक्षक अनमोल मित्तल, उपविभागीय पोलीस
अधिकारी अनिल लाड यांच्या मार्गदर्शनाखाली ही संपूर्ण कारवाई पार पडली. पोलीस
निरीक्षक सचिन हुंदळेकर, सपोनि. संदीपान सोनावणे, पोउपनि. श्याम आरमाळकर, सपोफौ. महादेव खोमणे,
पोहवा. नितीन धाग, राम शिंदे, राहुल गावडे, पोना. धनराज देवरे, पोको. अर्जुन पारधी, राम काळे, सपोनि. दानिश मन्सुरी आणि पोहवा. दीपक गायकवाड यांनी तपासात परिश्रम घेऊन
आरोपींना जेरबंद करण्यात व चोरीचा मुद्देमाल हस्तगत करण्यात महत्त्वपूर्ण भूमिका
बजावली. मुरबाड पोलिसांच्या या धडाकेबाज कारवाईमुळे ट्रान्सफॉर्मरमधील तांब्याच्या
तारा चोरी करणाऱ्या टोळीचा पर्दाफाश होऊन परिसरातील नागरिकांनी पोलिसांच्या
कामगिरीचे कौतुक केले आहे.




No comments