web-banner-lshep2024

Breaking News

एसटीच्या सवलतीच्या प्रवासात ‘कार्ड’चा अडथळा! ;भिवंडी–शहापूर, कल्याण–ठाणे मार्गावर बसफेऱ्या वाढविण्याची मागणी

 

गौरव शेलार  / भिवंडी : महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या (एसटी) बस प्रवासात महिला आणि ज्येष्ठ नागरिकांना मिळणारी भाडे सवलत अखंडित सुरू ठेवण्यासाठी १ सप्टेंबर २०२६ पासून नॅशनल कॉमन मोबिलिटी कार्ड (NCMC) प्रणाली लागू करण्यात आली आहे. मात्र या नव्या प्रणालीची पुरेशी माहिती प्रवाशांना न दिल्याने अनेक आगारांमध्ये महिला आणि ज्येष्ठ नागरिकांची मोठी गैरसोय होत असल्याचे चित्र समोर येत आहे.विशेषतः कार्डमध्ये आवश्यक बॅलन्स नसल्याचे सांगून काही ठिकाणी सवलतीच्या दरात तिकीट देण्यास वाहकांकडून नकार दिला जात असल्याच्या तक्रारी प्रवाशांकडून करण्यात येत आहेत. त्यामुळे शासनाच्या सवलतीचा लाभ घेण्यासाठी प्रवास करणाऱ्या महिला व ज्येष्ठ नागरिकांना नाईलाजाने पूर्ण भाड्याचे तिकीट काढावे लागत असून, त्यांच्यावर अतिरिक्त आर्थिक भार पडत आहे.

महामंडळाकडून कार्ड रिचार्ज करण्यासाठी बस वाहक तसेच अधिकृत एजंटांच्या माध्यमातून सुविधा उपलब्ध करून देण्यात आल्याचे सांगण्यात येत असले, तरी कार्डची नोंदणी करताना रिचार्ज करणे आवश्यक आहे, याबाबत प्रवाशांना पुरेशी पूर्वसूचना देण्यात आली का? असा सवाल आता उपस्थित होत आहे. अचानक लागू झालेल्या प्रणालीमुळे अनेक ज्येष्ठ नागरिकांना कार्ड कसे वापरायचे, त्यामध्ये किती रक्कम ठेवायची आणि रिचार्ज कुठे करायचे, याची माहिती नसल्याने आगारांमध्ये गोंधळाची परिस्थिती निर्माण होत आहे.

नवीन प्रणाली लागू करण्यापूर्वी प्रत्येक आगारात स्पष्ट सूचना फलक, प्रवाशांसाठी मार्गदर्शन कक्ष, तसेच वाहकांकडून प्रत्यक्ष माहिती देण्याची व्यवस्था करणे आवश्यक होते. मात्र प्रत्यक्षात पुरेशा जनजागृतीअभावी महिला व ज्येष्ठ नागरिकांना तिकीट काढताना अडचणींचा सामना करावा लागत असल्याचे प्रवासी सांगत आहेत.शासनाने सवलत दिली, कार्ड व्यवस्था आणली; मात्र सवलतीचा प्रत्यक्ष लाभ घेण्यासाठीच जर प्रवाशांना अडथळ्यांचा सामना करावा लागत असेल, तर या योजनेचा उद्देश काय? असा संतप्त सवाल ज्येष्ठ नागरिक आणि महिला प्रवाशांकडून केला जात आहे.

दरम्यान, भिवंडी–शहापूर तसेच कल्याण–ठाणे मार्गावर एसटी बससेवा अपुरी असल्याने नोकरदार, विद्यार्थी, महिला आणि ज्येष्ठ नागरिकांची मोठी गैरसोय होत आहे. अनेक वेळा बस उपलब्ध नसल्याने प्रवाशांना पुढील बसची प्रतीक्षा करावी लागते. परिणामी नोकरदारांना कामावर, विद्यार्थ्यांना शाळा-महाविद्यालयात आणि नागरिकांना त्यांच्या दैनंदिन कामांसाठी वेळेत पोहोचणे कठीण होत आहे.

परिवहन विभागाकडून राज्यभर नवीन बस उपलब्ध करून देण्याची प्रक्रिया सुरू असली, तरी ठाणे जिल्ह्यातील ग्रामीण भागात त्याचा अपेक्षित परिणाम अद्याप जाणवत नसल्याची नाराजी प्रवाशांकडून व्यक्त होत आहे. शहरांबरोबरच ग्रामीण भागातील प्रवाशांचाही विचार करून आवश्यक त्या मार्गांवर बसफेऱ्या वाढविण्याची मागणी जोर धरत आहे.

नॅशनल कॉमन मोबिलिटी कार्ड प्रणालीबाबत निर्माण झालेला गोंधळ दूर करण्यासाठी एसटी महामंडळाने प्रत्येक आगारात स्वतंत्र मार्गदर्शन व्यवस्था सुरू करावी, कार्ड रिचार्जबाबत स्पष्ट सूचना द्याव्यात आणि पात्र महिला व ज्येष्ठ नागरिकांना केवळ माहितीअभावी सवलतीपासून वंचित ठेवू नये, अशी मागणी प्रवाशांकडून होत आहे.तसेच भिवंडी–शहापूर आणि कल्याण–ठाणे यांसह ग्रामीण भागातील गर्दीच्या मार्गांवर अतिरिक्त बसफेऱ्या तातडीने सुरू कराव्यात, अशीही मागणी करण्यात येत आहे.

 

No comments