कळमखांडे गावात गोकुळाष्टमी सप्ताह पर्वाचा उत्साह; पारंपरिक दहीहंडीने रंगला भक्ती आणि संस्कृतीचा सोहळा
मुरबाड : ठाणे जिल्ह्यातील मुरबाड तालुक्यातील कळमखांडे गावाची सांस्कृतिक आणि धार्मिक परंपरा जपणारा २३ वा गोकुळाष्टमी सप्ताह पर्व यंदाही मोठ्या उत्साहात आणि भक्तिमय वातावरणात पार पडला. ग्रामस्थांच्या एकजुटीने आणि पारंपरिक पद्धतीने साजरा होणाऱ्या या उत्सवाला यंदाही गावकऱ्यांसह परिसरातील नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला.
गोकुळाष्टमी सप्ताहाच्या निमित्ताने सलग सहा दिवस गावात काकडा,हरिपाठ आणि कीर्तनाचे आयोजन करण्यात आले.पहाटेपासूनच भक्तिमय वातावरण निर्माण होत असून,महिला,पुरुष,ज्येष्ठ नागरिक तसेच तरुणाई मोठ्या संख्येने या धार्मिक कार्यक्रमात सहभागी झाली.सप्ताहाच्या समारोपानंतर काळेचे कीर्तन आयोजित करण्यात आले.त्यानंतर संपूर्ण गावासाठी महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले होते.महाप्रसादानंतर कळमखांडे गावातील पारंपरिक ‘गोपाळ’ सोहळ्याला सुरुवात झाली.गावातील घराघरांत गोपाळ नाचत जातात आणि ग्रामस्थांकडून त्यांचे उत्साहाने स्वागत केले जाते.या अनोख्या परंपरेमुळे गावातील वातावरणात उत्साह आणि आनंदाचे रंग भरले जातात.यानंतर सर्वांचे लक्ष लागून राहिलेल्या पारंपरिक दहीहंडी सोहळ्याला सुरुवात झाली.कळमखांडे गावातील दहीहंडीचे वैशिष्ट्य म्हणजे येथे महिला आणि पुरुष अशा स्वतंत्र दहीहंडीचे आयोजन केले जाते.गावातील महिला,पुरुष,मुले आणि मुली एकत्र येऊन हा उत्सव मोठ्या उत्साहात साजरा करतात.कळमखांडे येथील दहीहंडीची पारंपरिक पद्धतही विशेष आकर्षण ठरते.दहीहंडी फोडण्यासाठी जाणाऱ्या गोपाल किंवा गोपिकेच्या डोळ्यांवर घट्ट कापड बांधले जाते.त्यानंतर त्याला गोल फिरवून हंडी फोडण्यासाठी सोडले जाते.डोळ्यांवर पट्टी बांधलेली असल्याने अचूक अंदाज घेत हंडी फोडण्याचे हे कौशल्य पाहण्यासाठी ग्रामस्थांची मोठी गर्दी होते.या अनोख्या परंपरेमुळे कळमखांडेची दहीहंडी परिसरात विशेष ओळखली जाते.
सन २०२६ मध्ये महिला दहीहंडी फोडण्याचा मान सौ.मयुरी कुणाल शेलार यांनी मिळवला, तर पुरुष दहीहंडी फोडण्याचा मान कु.रुद्र चंद्रकांत कापडी यांनी पटकावला.हंडी फोडल्यानंतर उपस्थित ग्रामस्थांनी जल्लोष करत विजेत्यांचे अभिनंदन केले.या पारंपरिक दहीहंडी सोहळ्यात सहभागी विजेत्यांचा आणि उत्सवातील उल्लेखनीय सहभागाचा गौरवही करण्यात आला.ॐ साई क्रिकेट संघाच्या वतीने सन्मानचिन्ह,तसेच दत्ता कापडी यांच्या वतीने पैठणी साडी,तर आयोजकांच्या वतीने श्रीफळ, शाल आणि रोख रक्कम अशी पारितोषिके देऊन विजेत्यांचा सन्मान करण्यात आला.कळमखांडे गावातील गोकुळाष्टमी सप्ताह हा केवळ धार्मिक कार्यक्रम न राहता गावाची संस्कृती,परंपरा,सामाजिक एकोपा आणि ग्रामस्थांच्या एकजुटीचे दर्शन घडविणारा उत्सव म्हणून दरवर्षी साजरा केला जातो. विशेष म्हणजे या सोहळ्यात लहान मुलांपासून ज्येष्ठ नागरिकांपर्यंत सर्वजण उत्स्फूर्तपणे सहभागी होत असल्याने गावातील पिढ्यान्पिढ्या चालत आलेल्या परंपरांना नवी ऊर्जा मिळत आहे.दहीहंडी फोडण्याच्या या अनोख्या पद्धतीची सर्वांनाच वर्षभर उत्सुकता असते त्यामुळे गोकुळाष्टमी सप्ताहाचा शेवटचा दिवस उजाडताच गावातील वातावरण उत्साहाने भारून जाते.हजारो ग्रामस्थांच्या उपस्थितीत पार पडणाऱ्या या सोहळ्यात भक्ती,परंपरा,मनोरंजन आणि सामाजिक एकात्मतेचा सुंदर संगम पाहायला मिळतो.या संपूर्ण उत्सवाचे आयोजन कळमखांडे येथील सर्व ग्रामस्थ आणि आयोजकांनी एकत्रितपणे केले होते.ग्रामस्थांच्या सहकार्यामुळे आणि उत्स्फूर्त सहभागामुळे २३ व्या गोकुळाष्टमी सप्ताह पर्वाला यंदाही संस्मरणीय स्वरूप प्राप्त झाले. गावाची संस्कृती आणि पारंपरिक वारसा जपणारा हा सोहळा आगामी काळातही असाच उत्साहाने सुरू राहावा,अशी भावना ग्रामस्थांनी व्यक्त केली.



No comments