सौ.कमलताई किसन कथोरे महाविद्यालयाचा ७ वा वर्धापन दिन उत्साहात...
कुणाल शेलार/मुरबाड : जीवनदीप शैक्षणिक संस्था,पोई संचलित सौ.कमलताई किसन कथोरे कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय,म्हसा येथे महाविद्यालयाचा ७ वा वर्धापन दिन तसेच विद्यार्थी गुणगौरव सोहळा उत्साहपूर्ण वातावरणात पार पडला.शैक्षणिक,स्पर्धा परीक्षा तसेच विविध व्यावसायिक क्षेत्रांत उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या विद्यार्थ्यांचा यावेळी मान्यवरांच्या हस्ते गौरव करण्यात आला.कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी जीवनदीप शैक्षणिक संस्थेचे अध्यक्ष रविंद्र घोडविंदे होते. प्रमुख अतिथी म्हणून मुरबाड विधानसभा मतदारसंघाचे आमदार किसन कथोरे,मुरबाड पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक सचिन हुंदळेकर,जिल्हा परिषद ठाणे सदस्य उल्हास बांगर यांच्यासह विविध क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते.
मान्यवरांच्या हस्ते गणेशपूजन,सरस्वती पूजन व दीपप्रज्वलनाने कार्यक्रमाची सुरुवात झाली. त्यानंतर उपस्थित मान्यवरांचा शाल व पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला. महाविद्यालयाचे प्राचार्य प्रा.योगेश माळी यांनी प्रास्ताविकातून महाविद्यालयाच्या शैक्षणिक वाटचालीचा आढावा घेत कार्यक्रमाची भूमिका स्पष्ट केली.यावेळी आमदार किसन कथोरे,संस्थाध्यक्ष रविंद्र घोडविंदे तसेच कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक सुरेश बांगर यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले.शिक्षण हे केवळ पदवी मिळविण्याचे माध्यम नसून व्यक्तिमत्त्व विकास आणि उज्ज्वल भवितव्य घडविण्याचे प्रभावी साधन असल्याचे त्यांनी आपल्या मार्गदर्शनातून अधोरेखित केले.कार्यक्रमाचे विशेष आकर्षण ठरलेल्या गुणगौरव सोहळ्यात विविध स्पर्धा परीक्षांमधून शासकीय सेवेत निवड झालेल्या,वैद्यकीय शिक्षण पूर्ण करून वैद्यकीय क्षेत्रात कार्यरत असलेल्या तसेच शैक्षणिक क्षेत्रात उल्लेखनीय यश मिळविणाऱ्या विद्यार्थी-विद्यार्थिनींचा ‘जीवनदीप गौरव’ सन्मानपत्र,सन्मानचिन्ह व गुलाबपुष्प देऊन गौरव करण्यात आला.तसेच इयत्ता दहावी व बारावीच्या शालांत प्रमाणपत्र परीक्षेत प्रथम व द्वितीय क्रमांक मिळविणाऱ्या गुणवंत विद्यार्थ्यांचाही मान्यवरांच्या हस्ते सन्मानचिन्ह व प्रमाणपत्र देऊन सत्कार करण्यात आला.विद्यार्थ्यांच्या यशाचे कौतुक करत त्यांच्या पुढील शैक्षणिक वाटचालीसाठी मान्यवरांनी शुभेच्छा दिल्या.
कार्यक्रमाला भाजपा मुरबाड तालुकाध्यक्ष जितेंद्र भावार्थे,दीपक पवार,मुरबाड नगरपंचायतीचे माजी नगराध्यक्ष मोहन सासे,कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक सुरेश बांगर,कान्होळ-बोरिवलीच्या सरपंच रेश्मा घरत,सासणेच्या सरपंच रेश्मा खरे,तोंडलीच्या सरपंच सुष्मा पडवळ,भाजपा कोषाध्यक्ष बाळा घरत,वीर हुतात्मा भाई कोतवाल विद्यालयाचे प्राचार्य आनंद जाधव,पीएचडी पदवी प्राप्त संजय घुडे,विधी महाविद्यालय म्हसाच्या प्राचार्या सौ.कृष्णा अय्यर-अहिराव यांच्यासह शिक्षण क्षेत्रातील मान्यवरांची उपस्थिती होती.यावेळी धनाजी दळवी,खापरे सर आणि कु.रश्मी पष्टे यांनी मनोगत व्यक्त केले.कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी संस्थेच्या संचालिका सौ.स्मिता घोडविंदे,संचालक प्रशांत घोडविंदे,संस्थाध्यक्ष रविंद्र घोडविंदे आणि प्राचार्य प्रा.योगेश माळी यांचे मार्गदर्शन लाभले.महाविद्यालयातील प्राध्यापक व शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांनी कार्यक्रमाच्या आयोजनासाठी विशेष मेहनत घेतली.कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा.मयुरी घागस व प्रा.संकेत वाढविंदे यांनी केले,तर प्रा.विजय सोनार यांनी उपस्थितांचे आभार मानले.मुरबाड तालुक्यातील विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित राहिल्याने संपूर्ण परिसरात उत्साहाचे वातावरण निर्माण झाले होते.गुणवंत विद्यार्थ्यांचा गौरव आणि महाविद्यालयाच्या सात वर्षांच्या शैक्षणिक प्रवासाचा उत्सव अशा दुहेरी आनंदात वर्धापन दिन सोहळ्याची सांगता झाली.



No comments