web-banner-lshep2024

Breaking News

आमदार किसन कथोरे यांचा अभिष्टचिंतन सोहळा उत्साहात ;१०१ विद्यार्थिनींकडून औक्षण;१८ गरजू विद्यार्थ्यांच्या वार्षिक शैक्षणिक शुल्काची जबाबदारी घेत कुणाल शेलार व मयुरी शेलार यांचा अनोखा उपक्रम

 

कुणाल शेलार/मुरबाड : मुरबाड तालुका शिक्षण संस्थेच्या वतीने संस्थेचे अध्यक्ष तथा मुरबाड विधानसभा मतदारसंघाचे आमदार किसनजी कथोरे साहेब यांच्या वाढदिवसानिमित्त अभिष्टचिंतन सोहळ्याचे आयोजन शनिवार,दि.१२ सप्टेंबर २०२६ रोजी न्यू इंग्लिश स्कूल व कनिष्ठ महाविद्यालय,मुरबाड येथे करण्यात आले.संस्थेचे पदाधिकारी,शिक्षक-शिक्षकेतर कर्मचारी,विद्यार्थी,पालक व हितचिंतक यांच्या उपस्थितीत हा सोहळा उत्साहपूर्ण वातावरणात संपन्न झाला.या सोहळ्यात १०१ विद्यार्थिनींनी आमदार किसन कथोरे यांचे औक्षण करून त्यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या.यावेळी शिक्षिका मोहपे मॅडम यांनी आमदार किसन कथोरे यांच्या जीवनप्रवासाचा,समाजकार्याचा आणि त्यांच्या कार्याचा लेखाजोखा सुंदर गीतातून मांडला.त्यांच्या या सादरीकरणाने कार्यक्रमात विशेष रंगत निर्माण झाली.कार्यक्रमादरम्यान सर्व दुय्यम शिक्षण संस्था,न्यू इंग्लिश स्कूल,मुरबाडचे सचिव किसन चौधरी, प्राचार्य राकेश पाडवी सर, तसेच शिक्षक-शिक्षिका यांनी आमदार किसन कथोरे यांचे अभिष्टचिंतन करून त्यांना वाढदिवसाच्या मनःपूर्वक शुभेच्छा दिल्या.

आमदार किसन कथोरे यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून पत्रकार कुणाल शेलार तसेच साप्ताहिक मुरबाड जनशाही वृत्तपत्राच्या संपादिका सौ.मयुरी शेलार यांच्या वतीने यावेळी एक सामाजिक बांधिलकी जपणारा अनोखा उपक्रम राबविण्यात आला.आई-वडिलांचे छत्र नसलेल्या तसेच आर्थिक परिस्थिती कमकुवत असलेल्या १८ गरजू विद्यार्थ्यांच्या एका वर्षाच्या शैक्षणिक शुल्काची जबाबदारी स्वीकारून त्यांना मदतीचा हात देण्यात आला.शिक्षणापासून कोणताही विद्यार्थी आर्थिक अडचणींमुळे वंचित राहू नये,या उद्देशाने करण्यात आलेल्या या उपक्रमाचे उपस्थितांनी कौतुक केले.यावेळी आमदार किसन कथोरे यांनी कुणाल शेलार व सौ.मयुरी शेलार यांच्या या उपक्रमाचे विशेष अभिनंदन केले.गोरगरीब व गरजू विद्यार्थ्यांना शिक्षणासाठी मदत करण्याचा हा उपक्रम अत्यंत स्तुत्य असून,समाजात अशा विधायक आणि संवेदनशील उपक्रमांची गरज असल्याचे त्यांनी नमूद केले.

अभिष्टचिंतन सोहळ्यात विद्यार्थ्यांनी विविध सांस्कृतिक कार्यक्रम सादर केले. गणेशवंदना, गीत,नृत्य सादरीकरणातून विद्यार्थ्यांनी आपल्या कलागुणांचे दर्शन घडविले.या कार्यक्रमांना उपस्थितांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला.यावेळी आमदार किसन कथोरे यांनी उपस्थित विद्यार्थी व संस्था परिवाराला मार्गदर्शन केले.शिक्षण,संस्कार,शिस्त आणि विद्यार्थ्यांच्या उज्ज्वल भविष्यासाठी संस्थेच्या माध्यमातून सुरू असलेल्या प्रयत्नांना त्यांनी प्रोत्साहन दिले.या अभिष्टचिंतन सोहळ्याला जि.प.सदस्य उल्हासभाऊ बांगर,भाजपा तालुका अध्यक्ष दीपक पवार,ॲड.जितेंद्र भावार्थे,कृषी उत्पन्न बाजार समितीचे सुरेश बांगर,मुरबाड नगरपंचायतीचे नगराध्यक्ष मोहन गडगे,उपनगराध्यक्ष नम्रता तेलवणे,नगरसेविका मधुरा सासे,माजी नगराध्यक्ष मोहन सासे,मुकेश विशे,किसन अनंत कथोरे,भाई तेलवणे,नगरसेवक अक्षय रोठे,नगरसेवक विनायक राव,मोहनिश तेलवणे,अमित शिंदे, अभिजीत तेलवणे यांच्यासह मोठ्या संख्येने विद्यार्थी-विद्यार्थिनी,शिक्षक-शिक्षिका व संस्था परिवार उपस्थित होता.आमदार किसन कथोरे यांच्या वाढदिवसानिमित्त झालेला हा सोहळा शुभेच्छा, संस्कार, सामाजिक बांधिलकी आणि शैक्षणिक मदतीचा सुंदर संगम ठरला.

No comments