मुरबाडकरांना गौरी-गणपतीची आगळीवेगळी भेट; मुरबाड आगारात पाच नव्या ‘जिजाऊ’ बसेसचे लोकार्पण
कुणाल शेलार/मुरबाड : गौरी-गणपती सणाच्या पार्श्वभूमीवर मुरबाड विधानसभा मतदारसंघातील नागरिकांना प्रवासाची सुविधा अधिक सुखकर, सुरक्षित आणि आरामदायी करण्याच्या दृष्टीने आज, १२ सप्टेंबर २०२६ रोजी, मुरबाड आगारात पाच नव्या ‘जिजाऊ’ बसेसचे लोकार्पण करण्यात आले. मुरबाड विधानसभा मतदारसंघाचे कार्यसम्राट आमदार किसन कथोरे यांच्या प्रमुख उपस्थितीत हा लोकार्पण सोहळा उत्साहात पार पडला.मुरबाडकरांच्या प्रवासाच्या सुविधेत भर घालणाऱ्या या नव्या बसेसमुळे ग्रामीण भागातील नागरिक, विद्यार्थी, महिला, नोकरदार आणि शेतकरी यांना मोठा दिलासा मिळणार असून मुरबाड आणि परिसरातील सार्वजनिक वाहतूक व्यवस्था अधिक सक्षम होण्यास मदत होणार आहे.
लोकार्पण करण्यात आलेल्या पाच बसेसपैकी चार बसेस मुरबाड–किन्हवली मार्गे शहापूर या मार्गावर धावणार आहेत. तर एक बस धसई मार्गे आवळे या मार्गावर सेवा देणार आहे. यामुळे या मार्गावरील प्रवाशांना अधिक चांगली आणि नियमित वाहतूक सुविधा मिळण्याची अपेक्षा आहे.तसेच, मुरबाड–बदलापूर रोडचे काम सुरू असल्याने, काम पूर्ण झाल्यानंतर लवकरच याच नव्या बसेस मुरबाड–बदलापूर मार्गावरही धावणार असल्याची माहिती यावेळी देण्यात आली. त्यामुळे मुरबाडकरांचा बदलापूरकडे होणारा प्रवास अधिक सोयीस्कर होण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.
यावेळी बोलताना आमदार किसन कथोरे यांनी सांगितले की, “मुरबाडच्या जनतेला चांगल्या सुविधा मिळाव्यात, हा आपल्या विकासकामांचा केंद्रबिंदू आहे. सार्वजनिक वाहतूक ही सर्वसामान्य नागरिकांच्या दैनंदिन जीवनाशी जोडलेली अत्यंत महत्त्वाची बाब आहे. विद्यार्थी, महिला, शेतकरी, कामगार आणि नोकरदार वर्गाला वेळेवर व सुरक्षित प्रवासाची सुविधा मिळणे आवश्यक आहे. त्यासाठी मुरबाड आगाराला नव्या बसेस उपलब्ध करून देण्यासाठी शासन स्तरावर सातत्याने पाठपुरावा करण्यात आला. आज पाच नव्या बसेसचे लोकार्पण झाले असून, उद्या आणखी सात बसेस दाखल होणार आहेत. त्यामुळे मुरबाडकरांना एकूण बारा नव्या बसेसची सुविधा मिळणार आहे. गौरी-गणपतीच्या सणाच्या काळात मुरबाडकरांना ही सुविधा उपलब्ध झाल्याबद्दल समाधान व्यक्त करताना त्यांनी भविष्यातही मतदारसंघातील सार्वजनिक वाहतूक, रस्ते आणि मूलभूत सुविधांच्या विकासासाठी प्रयत्न सुरू राहतील असेही सांगितले.
या लोकार्पण सोहळ्यास जि.प.मा.उपाध्यक्ष सुभाष पवार,जि.प.सदस्य उल्हासभाऊ बांगर,भाजपा तालुका अध्यक्ष दीपक पवार,ह.भ.प.रामभाऊ दळवी,मुरबाड नगरपंचायतीचे नगराध्यक्ष मोहन गडगे,उपनगराध्यक्ष नम्रता तेलवणे,माजी नगराध्यक्ष मोहन सासे,मुकेश विशे,आगारप्रमुख मुसळे,आगारातील श्री.देशमुख,श्रीकांत कोर,श्री.पाटोळे,शंकर गायकर यांच्यासह आगारातील सर्व वाहनचालक,वाहक आणि अन्य मान्यवर उपस्थित होते.

%20Instagram.png)
%20Instagram.png)

%20Instagram.png)

No comments