web-banner-lshep2024

Breaking News

महादेव खोमणे यांची पोलीस उपनिरीक्षकपदी पदोन्नती;कर्तव्यनिष्ठ सेवेची दखल

 

गौरव शेलार/मुरबाड : खाकी वर्दीचा मान राखत कर्तव्य बजावताना गुन्हेगारीविरोधात कठोर भूमिका आणि सर्वसामान्य नागरिकांप्रती माणुसकीची भावना जपणारे महादेव खोमणे मेजर यांची पोलीस उपनिरीक्षकपदी पदोन्नती झाली आहे.त्यांच्या या पदोन्नतीचे सर्व स्तरातून स्वागत होत असून,सहकारी,वरिष्ठ अधिकारी आणि नागरिकांकडून त्यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.

          पोलीस सेवेत कार्यरत असताना महादेव खोमणे यांनी अनेक गंभीर गुन्ह्यांच्या तपासात महत्त्वाची भूमिका बजावली आहे.वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली आपल्या गोपनीय सूत्रांचे जाळे आणि तपासकौशल्याचा प्रभावी वापर करत अनेक गुन्ह्यांची उकल करून आरोपींना जेरबंद करण्याची कामगिरी त्यांनी बजावली आहे.गुन्हेगारांसाठी त्यांची कडक कार्यपद्धती अनेकदा चर्चेचा विषय ठरली;मात्र सामान्य नागरिकांशी वागताना त्यांनी कधीही आपल्या पदाचा किंवा खाकी वर्दीचा दबाव दाखवला नाही.गुन्हेगारांसाठी कर्दनकाळ आणि जनतेसाठी आधारवड,अशी त्यांची ओळख निर्माण झाली आहे.पोलीस अधिकारी म्हणून जबाबदारी पार पाडताना केवळ गुन्हेगारीविरोधात कारवाई करण्यापुरतेच त्यांचे कार्य मर्यादित राहिले नाही. अनेक कौटुंबिक वादांमध्ये कुटुंब तुटण्याच्या उंबरठ्यावर असताना त्यांनी समंजसपणे संवाद साधत संबंधितांना योग्य सल्ला दिला.अनेक कुटुंबे उध्वस्त होण्यापासून वाचावीत,हा मानवतावादी दृष्टिकोन त्यांनी कायम जपला त्यामुळे अनेक नागरिकांना त्यांच्यात पोलीस अधिकारी नव्हे,तर मोठा भाऊ आणि ‘दादा’ म्हणून आधार देणारी व्यक्ती दिसली.महादेव खोमणे यांनी अनेक वरिष्ठ पोलीस निरीक्षकांच्या मार्गदर्शनाखाली जागृत पथकाचा एक महत्त्वाचा भाग म्हणून काम केले.गुन्हेगारीच्या घटनांमध्ये तत्परता दाखवत तपासाला गती देणे,आरोपींचा माग काढणे आणि गुन्हे उघडकीस आणण्यासाठी आवश्यक माहिती मिळवणे,यामध्ये त्यांनी सातत्याने आपली कार्यक्षमता सिद्ध केली.विशेष म्हणजे, पोलिसी बाणा कायम ठेवताना त्यांनी नागरिकांशी कधीही दमदाटी अथवा दबंगगिरीचा मार्ग स्वीकारला नाही.दबंगगिरी जर कुठे दिसली असेल,तर ती गुन्हेगारांविरोधातील कारवाईतच! जनतेशी मात्र संयम,आपुलकी आणि माणुसकीने वागणे,ही त्यांच्या कार्यपद्धतीची विशेष ओळख राहिली आहे.‘जनसेवा हीच खरी पोलीस सेवा’ या भावनेतून त्यांनी आपली जबाबदारी पारदर्शकपणे पार पाडली. खाकी वर्दीचा सन्मान राखत कर्तव्य, शिस्त, धाडस आणि माणुसकी यांचा सुरेख समतोल साधणाऱ्या त्यांच्या कार्याची अखेर दखल घेत त्यांना पोलीस उपनिरीक्षकपदाची पदोन्नती मिळाली आहे.त्यांच्या या पदोन्नतीमुळे त्यांच्या पुढील सेवेला नवे बळ मिळणार असून, गुन्हेगारीविरोधातील त्यांची धडाडी आणि नागरिकांप्रती असलेली आपुलकी यापुढेही कायम राहील, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे.

 

No comments