गणेशनगर ते माळीपाडा प्रलंबित रस्त्याला अखेर मुहूर्त ; गणेशोत्सवापूर्वी रस्त्याचे काम सुरू
गौरव शेलार/मुरबाड : गणेशनगर ते माळीपाडा दरम्यान गेल्या कित्येक वर्षांपासून प्रलंबित असलेल्या रस्त्याच्या कामाला अखेर मुहूर्त सापडला आहे. गणेशोत्सवाच्या सणापूर्वी रस्त्याच्या कामाला सुरुवात झाल्याने या मार्गावरून ये-जा करणाऱ्या विद्यार्थी, नागरिक, ज्येष्ठ नागरिक तसेच प्रवाशांना मोठा दिलासा मिळाला आहे.या रस्त्याची अवस्था अनेक वर्षांपासून खराब असल्याने नागरिकांना मोठ्या त्रासाला सामोरे जावे लागत होते. खड्डे, खराब रस्ता आणि वाहतुकीची वाढती वर्दळ यामुळे या मार्गावर अपघातांच्या घटनाही घडल्या आहेत. अपघातांमध्ये अनेकांना दुखापती झाल्याने नागरिकांमध्ये नाराजीचे वातावरण होते.
गणेशनगर ते माळीपाडा हा मार्ग परिसरातील गावांना मुख्य महामार्गाशी जोडणारा महत्त्वाचा दुवा आहे. त्यामुळे या रस्त्यावर दिवसभर मोठ्या प्रमाणात नागरिक, विद्यार्थी, दुचाकीस्वार तसेच प्रवाशांची वर्दळ असते. रस्त्याच्या कामाला सुरुवात झाल्याने नागरिकांनी समाधान व्यक्त केले असून, अनेक वर्षांच्या प्रतीक्षेनंतर सुटकेचा नि:श्वास सोडला आहे.रस्त्याचे काम मार्गी लावल्याबद्दल परिसरातील नागरिक, विद्यार्थी, ज्येष्ठ नागरिक आणि प्रवाशांनी मुरबाड नगरपंचायतीचे आभार मानले आहेत. रस्त्याचे काम दर्जेदार पद्धतीने आणि निर्धारित वेळेत पूर्ण व्हावे, अशी अपेक्षाही नागरिकांकडून व्यक्त करण्यात येत आहे.



No comments