web-banner-lshep2024

Breaking News

मुरबाडच्या राजाचे आज आगमन; महागाईच्या लाटेत गणेशोत्सवाची रंगत

 

नामदेव शेलार /  मुरबाड : ब्रिटिशकालीन परंपरेचा वारसा जपणाऱ्या मुरबाडच्या राजा’चे आज सायंकाळी थाटात आगमन होणार असून, यंदाचा हा गणेशोत्सव विशेष ठरणार आहे. ब्रिटिश राजवटीच्या काळात स्थापना झालेल्या या गणरायाचे हे ९६वे वर्ष आहे. जाधव कुटुंबीयांच्या घरी विराजमान होणाऱ्या मुरबाडच्या राजाच्या दर्शनासाठी ठाणे जिल्ह्यासह ग्रामीण भागातून दरवर्षी हजारो भाविक मुरबाडमध्ये दाखल होतात.

एकादशीच्या दिवशी जुन्या मोठ्या तलावात रात्री उशिरा मिरवणुकीने मुरबाडच्या राजाचे विसर्जन केले जाते. यावेळी मुरबाडच्या तहसीलदारांना सत्यनारायण पूजेचा मान दिला जातो. विविध धार्मिक व सामाजिक कार्यक्रमांचे आयोजनही करण्यात येते. नवस फेडण्यासाठी येणाऱ्या भाविकांच्या सेवेसाठी ताडआळी गणेश मंडळाकडून व्यवस्था केली जाते, तर मुरबाड पोलिसांकडून चोख बंदोबस्त ठेवण्यात येतो.

दरम्यान, मुरबाड शहरात गणेशोत्सवाची लगबग वाढली असून मखर आणि सजावटीच्या स्पर्धांना रंगत आली आहे. मात्र या उत्सवावर यंदा महागाईचे सावट आहे. गणेशमूर्तीपेक्षाही मखरांच्या किमती काही ठिकाणी अधिक झाल्याचे चित्र आहे. बाजारात दोन हजारांपासून तब्बल दहा-पंधरा हजार रुपयांपर्यंत मखर उपलब्ध असून, आकर्षक सजावटीसाठी नागरिकांची मोठी गर्दी होत आहे.

नारळ, साखर, मिठाई, फुले, अगरबत्ती, मोदक आणि पूजासाहित्याच्या दरात वाढ झाल्याने गणेशभक्तांच्या खिशाला चांगलीच झळ बसत आहे. गौरी-गणपतीच्या दहा दिवसांच्या उत्सवात केळीला विशेष मागणी असते. नवस फेडण्यासाठी आणि नैवेद्यासाठी केळी मोठ्या प्रमाणावर खरेदी केली जातात. मात्र यंदा केळीचा दरही एक डझन ७० ते ८० रुपयांवर पोहोचला आहे.

मुरबाडसह ग्रामीण भागात केळीच्या वखारी असून, कच्ची केळी पिकवून बाजारात आणली जातात. मात्र पावडर अथवा रासायनिक प्रक्रियेने केळी पिकवण्याच्या प्रकारांवर अन्न व औषध प्रशासनाने (FDA) लक्ष ठेवण्याची गरज निर्माण झाली आहे. अन्नभेसळविरोधी कारवाईमुळे अशा प्रकारे केळी पिकवून विकणाऱ्यांचे धाबे दणाणले असले, तरी भक्तांच्या ताटात सुरक्षित आणि नैसर्गिकरीत्या पिकलेली फळेच पोहोचत आहेत का, हा प्रश्न कायम आहे.

गौरी सजावटीसाठी रानमाळातून फुले आणण्याची परंपरा असली, तरी यंदा फुलांच्या दरातही वाढ झाली आहे. सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांमध्ये देखाव्यांची स्पर्धा सुरू असताना घराघरांत गौरी सजावटीची चुरस पाहायला मिळत आहे. मखर सजावटीचे काम रात्री उशिरापर्यंत सुरू असून बाजारपेठेत खरेदीसाठी गर्दी वाढत आहे.

मुरबाडमध्ये देवीची ज्योत, तसेच सोन्याचा मुकुट धारण केलेल्या लालबागच्या राजाच्या स्वरूपातील गणेशाची स्थापना विविध ठिकाणी होत असून, नवस फेडण्यासाठी भाविकांची गर्दी होणार आहे. पोलिस लाईनमध्येही गणेशाची स्थापना करण्यात येते.

गणेशोत्सव हा सर्वसामान्यांच्या श्रद्धेचा आणि आनंदाचा सण; मात्र श्रद्धेच्या या उत्सवात महागाईनेही आपला वाटा मागितला आहे. बाप्पाच्या मूर्तीपासून प्रसादापर्यंत आणि मखरापासून फुलांपर्यंत प्रत्येक वस्तूच्या वाढलेल्या दरामुळे सामान्य कुटुंबांचे गणित बिघडत आहे.गणेशोत्सवात भाविकांची श्रद्धा वाढते, पण बाजारातील दरही वाढतात; भक्तीच्या या उत्सवाला महागाईचा फटका बसू नये, यासाठी अन्नपुरवठा, कृषी विभाग आणि FDA यांनी बाजारपेठेवर करडी नजर ठेवण्याची गरज आहे.

 

No comments