कष्टकरी बहिणींच्या हातून आमदार किसन कथोरे यांनी बांधून घेतली राखी; मायेच्या नात्याने रक्षाबंधनाचा सण उत्साहात
गौरव शेलार / बदलापूर : बदलापूर शहरातील घरकाम करून तसेच रिक्षा चालवून आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह करणाऱ्या कष्टकरी बहिणींनी आमदार किसन कथोरे यांना राखी बांधून रक्षाबंधनाचा सण साजरा केला. दरवर्षीप्रमाणे यंदाही या भगिनींनी आमदार कथोरे यांची भेट घेत त्यांच्या हातावर राखी बांधली.
आमदार किसन कथोरे आणि या कष्टकरी भगिनींमध्ये गेल्या अनेक वर्षांपासून जिव्हाळ्याचे नाते निर्माण झाले आहे. या नात्यात कोणताही औपचारिकपणा नसून माया, विश्वास, आपुलकी आणि कुटुंबीयांच्या भावनेचा ओलावा असल्याचे यावेळी प्रकर्षाने जाणवले.राखी बांधल्यानंतर आमदार कथोरे यांनी या भगिनींशी मनमोकळा संवाद साधला. त्यांच्या हातून राखी बांधून घेताना मिळणारा आनंद आणि त्यांचा आशीर्वाद आपल्यासाठी नेहमीच अनमोल असल्याचे आमदार किसन कथोरे यांनी सांगितले.
“या प्रेमळ भगिनींनी माझ्या हातावर बांधलेली राखी माझ्यासाठी केवळ एक धागा नाही, तर त्यांच्या सुख-दुःखात सदैव सोबत राहण्याची आणि त्यांच्या हितासाठी कार्य करण्याची जाणीव करून देणारा विश्वासाचा धागा आहे,” अशी भावना आमदार कथोरे यांनी व्यक्त केली.कष्टकरी महिलांनीही आमदार कथोरे यांच्याबद्दल असलेली आपुलकी व्यक्त करत, दरवर्षी रक्षाबंधनाच्या निमित्ताने त्यांना राखी बांधण्याची परंपरा यापुढेही कायम ठेवण्याची भावना व्यक्त केली.
रक्षाबंधनाच्या या सोहळ्यात भाऊ-बहिणीच्या रक्ताच्या नात्यापेक्षा माणुसकीच्या नात्याला अधिक महत्त्व असल्याचे चित्र पाहायला मिळाले. कष्टकरी भगिनी आणि आमदार कथोरे यांच्यातील हा स्नेहभाव उपस्थितांसाठीही भावनिक आणि प्रेरणादायी ठरला.




No comments