मुरबाडमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात; विविध शासकीय व शैक्षणिक संस्थांमध्ये ध्वजारोहण सोहळा
कुणाल शेलार / मुरबाड : भारताचा ८० वा स्वातंत्र्यदिन मुरबाड तालुक्यात देशभक्तीचा उत्साह आणि अभिमानाच्या वातावरणात विविध शासकीय, शैक्षणिक व सामाजिक संस्थांमध्ये मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. शहरातील न्यू इंग्लिश स्कूल, मुरबाड नगरपंचायत, तहसील कार्यालय, ग्रामीण रुग्णालय तसेच पंचायत समिती येथे मान्यवरांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले.
न्यू इंग्लिश स्कूलमध्ये आमदार किसन कथोरे यांच्या हस्ते ध्वजारोहण - दुय्यम संस्था संचलित न्यू इंग्लिश स्कूल, मुरबाड येथे संस्थेचे अध्यक्ष तथा आमदार किसन कथोरे यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. यावेळी पक्षाचे पदाधिकारी व कार्यकर्ते, शाळेचे प्राचार्य, उपप्राचार्य, शिक्षक, विद्यार्थी, पत्रकार, नागरिक तसेच विविध क्षेत्रातील मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते.यावेळी आमदार किसन कथोरे यांनी विद्यार्थ्यांशी संवाद साधत स्वातंत्र्यदिनाचे महत्त्व, देशाच्या विकासाची वाटचाल आणि भारताची बदलती भूमिका याबाबत मार्गदर्शन केले.
भारताने स्वातंत्र्यानंतर विविध क्षेत्रांत उल्लेखनीय प्रगती केली असून आज भारताची ओळख जगातील एक प्रगतिशील आणि सामर्थ्यवान देश म्हणून निर्माण होत आहे, असे त्यांनी सांगितले.“आजच्या विद्यार्थ्यांमध्येच उद्याच्या भारताचे नेतृत्व दडलेले आहे. विज्ञान, तंत्रज्ञान, शिक्षण, उद्योग, कृषी आणि संरक्षण क्षेत्रात भारत वेगाने पुढे जात आहे. देशाच्या विकासाची ही गती कायम ठेवण्यासाठी विद्यार्थ्यांनी शिक्षणासोबतच देशप्रेम, सामाजिक बांधिलकी आणि संविधानिक मूल्ये आत्मसात करणे आवश्यक आहे,” असे आवाहन आमदार कथोरे यांनी केले. देशाच्या प्रगतीमध्ये तरुणांची भूमिका अत्यंत महत्त्वाची असून जबाबदार नागरिक म्हणून देशाच्या विकासात योगदान देण्याचे आवाहनही त्यांनी विद्यार्थ्यांना केले.
मुरबाड नगरपंचायतीत मुख्याधिकारी मनोज म्हसे यांच्या हस्ते ध्वजारोहण - मुरबाड नगरपंचायतीमध्येही स्वातंत्र्यदिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. मुख्याधिकारी मनोज म्हसे यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. यावेळी आजी-माजी नगराध्यक्ष, नगरसेवक, नगरपंचायतीचे अधिकारी-कर्मचारी तसेच नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. उपस्थितांनी राष्ट्रध्वजाला मानवंदना देत स्वातंत्र्यदिनाच्या शुभेच्छा दिल्या.
तहसील कार्यालयात तहसीलदार अभिजीत देशमुख यांच्या हस्ते ध्वजारोहण - मुरबाड तहसील कार्यालयाच्या आवारात तहसीलदार अभिजीत देशमुख यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. यावेळी मुरबाड पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक सचिन हुंदळेकर, निवासी नायब तहसीलदार श्री. शिंदे, नायब तहसीलदार सुषमा बांगर, विविध सामाजिक संघटनांचे पदाधिकारी, पक्षाचे कार्यकर्ते, अधिकारी-कर्मचारी, समाजसेवक, पत्रकार तसेच नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
यावेळी तहसीलदार अभिजीत देशमुख यांनी ८० व्या भारतीय स्वातंत्र्यदिनानिमित्त उपस्थितांना शुभेच्छा देत स्वातंत्र्यलढ्याचा इतिहास आणि स्वातंत्र्याचे महत्त्व विशद केले. देशाला मिळालेले स्वातंत्र्य ही मोठी राष्ट्रीय संपत्ती असून ते अधिक मजबूत करण्यासाठी प्रत्येक नागरिकाने आपली कर्तव्ये प्रामाणिकपणे पार पाडली पाहिजेत, असे त्यांनी सांगितले.
ग्रामीण रुग्णालयात डॉ. संग्राम डांगे यांच्या हस्ते ध्वजारोहण - मुरबाड ग्रामीण रुग्णालयात वैद्यकीय अधीक्षक तथा नेत्रशल्यचिकित्सक डॉ. संग्राम डांगे यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. यावेळी संतोष सुरवसे (क्लार्क) यांच्यासह रुग्णालयातील डॉक्टर, परिचारिका, अधिपरिचारिका, कार्यालयीन कर्मचारी आणि कर्मचारीवृंद उपस्थित होते. सर्वांनी राष्ट्रध्वजाला सलामी देत स्वातंत्र्यदिन साजरा केला.
पंचायत समितीतही स्वातंत्र्यदिन उत्साहात - मुरबाड पंचायत समिती येथे गटविकास अधिकारी यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. यावेळी तालुका आरोग्य अधिकारी डॉ. श्रीधर बनसोडे यांच्यासह आरोग्य विभाग तसेच पंचायत समितीतील विविध विभागांचे अधिकारी-कर्मचारी आणि नागरिक उपस्थित होते.
मुरबाड शहरातील विविध शासकीय व शैक्षणिक संस्थांमध्ये झालेल्या या ध्वजारोहण सोहळ्यांमुळे संपूर्ण शहरात देशभक्तीचे वातावरण निर्माण झाले होते. राष्ट्रध्वजाला मानवंदना देत उपस्थितांनी स्वातंत्र्यसैनिकांच्या त्यागाचे स्मरण केले. स्वातंत्र्याचे संरक्षण, संविधानाचा सन्मान आणि देशाच्या प्रगतीसाठी प्रत्येक नागरिकाने आपली जबाबदारी पार पाडावी, असा संदेश या सर्व कार्यक्रमांतून देण्यात आला.



No comments