आदिवासी समाजाच्या हक्क, अस्मिता आणि विकासासाठी कटिबद्ध - आमदार किसन कथोरे
गौरव शेलार / मुरबाड : जागतिक आदिवासी दिनानिमित्त मुरबाड येथील कुणबी समाज हॉलमध्ये आयोजित करण्यात आलेल्या कार्यक्रमास आमदार किसन कथोरे यांनी उपस्थित राहून आदिवासी बांधव-भगिनींसोबत हा महत्त्वपूर्ण दिवस उत्साहात साजरा केला. यावेळी आदिवासी समाजाच्या समृद्ध संस्कृती, परंपरा, जीवनपद्धती तसेच जल, जंगल आणि जमीन यांच्या संवर्धनासाठी त्यांनी दिलेल्या योगदानाचा गौरव करण्यात आला.
आदिवासी समाजाची संस्कृती, परंपरा आणि जीवनपद्धती ही महाराष्ट्राच्या सामाजिक आणि सांस्कृतिक वारशाची अमूल्य ठेव आहे. या समृद्ध वारशाचे जतन करतानाच आदिवासी समाजाच्या हक्कांचे आणि अस्मितेचे संरक्षण करणे आवश्यक आहे. त्यासाठी शिक्षण, आरोग्य, रोजगार, मूलभूत सुविधा आणि आर्थिक विकासाच्या माध्यमातून आदिवासी बांधवांच्या सर्वांगीण प्रगतीसाठी सातत्याने प्रयत्न करण्याची गरज असल्याचे यावेळी व्यक्त करण्यात आले.
भगवान बिरसा मुंडांच्या विचारांतून प्रेरणा घेण्याचा संकल्प
जननायक भगवान बिरसा मुंडा यांच्या विचारांतून प्रेरणा घेत आदिवासी समाजाचा सन्मान, अधिकार आणि प्रगतीसाठी सदैव कटिबद्ध राहण्याचा संकल्प यावेळी व्यक्त करण्यात आला. शासनाच्या विविध योजना आणि उपक्रमांचा लाभ आदिवासी समाजातील प्रत्येक पात्र लाभार्थ्यापर्यंत प्रभावीपणे पोहोचविण्यासाठी सातत्याने प्रयत्न केले जातील, असा विश्वासही व्यक्त करण्यात आला.
आदिवासी समाजाच्या विकासासाठी केवळ योजना जाहीर करून चालणार नाही, तर त्या योजनांची प्रभावी अंमलबजावणी होऊन त्याचा प्रत्यक्ष लाभ तळागाळातील नागरिकांपर्यंत पोहोचणे महत्त्वाचे आहे. यासाठी शासन आणि लोकप्रतिनिधींच्या माध्यमातून सातत्याने पाठपुरावा करण्याची भूमिका यावेळी मांडण्यात आली.कार्यक्रमाच्या निमित्ताने उपस्थित सर्व आदिवासी बांधव-भगिनींना जागतिक आदिवासी दिनाच्या मनःपूर्वक शुभेच्छा देण्यात आल्या. आदिवासी समाजाच्या परंपरा, संस्कृती आणि अस्मितेचा गौरव करत त्यांच्या उज्ज्वल भविष्यासाठी एकजुटीने काम करण्याचा संदेश यावेळी देण्यात आला.
यावेळी व्यासपीठावर आमदार किसन कथोरे,मा.जिल्हा परिषद सदस्य सुभाषदादा पवार, तहसीलदार अभिजीत देशमुख, युवा नेते प्रतीक हिंदुराव (राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी), माजी नगराध्यक्ष मोहन सासे यांच्यासह पदाधिकारी कार्यकर्ते तसेच आदिवासी बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.



No comments