जागतिक आदिवासी दिन व क्रांती दिन पनवेलमध्ये उत्साहात साजरा
रोहित शिंदे / पनवेल : जागतिक आदिवासी दिन व क्रांती दिनानिमित्त पनवेल येथील गोखले हॉलमध्ये ९ ऑगस्ट २०२६ रोजी भव्य कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. विविध क्षेत्रांतील मान्यवर, लोकप्रतिनिधी, सामाजिक कार्यकर्ते, पोलीस अधिकारी तसेच मोठ्या संख्येने आदिवासी बांधवांच्या उपस्थितीत हा कार्यक्रम उत्साहात पार पडला.
कार्यक्रमाचे उद्घाटन ज्येष्ठ पत्रकार निलेश सोनवणे, प्रहार संघटना रायगड जिल्हाध्यक्ष सुनील शिरीषकर, समाजसेवक तथा पत्रकार अण्णा पंडित, आदिवासी विकास परिषदेचे संस्थापक अध्यक्ष अॅड. मदन गोवारी, भीमशक्ती संघटनेचे सुभाषजी गायकवाड, शैलेश पाटील (चिखले), डॉ. श्री. हांडे पाटील (पनवेल), स्वतंत्र संपादक पत्रकार संघ महाराष्ट्र राज्याचे रोहित शिंदे आणि पनवेल तालुका पोलीस ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक अभिजीत व्हरांबळे यांच्या हस्ते करण्यात आले.
कार्यक्रमास आमदार विक्रांत पाटील, स्वतंत्र संपादक पत्रकार संघ ऑल भारतचे संस्थापक राष्ट्रीय अध्यक्ष नामदेव शेलार, पनवेल महानगरपालिकेचे नगरसेवक शशिकांत शेळके यांच्यासह अनेक मान्यवरांची प्रमुख उपस्थिती होती. पनवेल महानगरपालिकेचे महापौर नितीन पाटील यांनी दूरध्वनीद्वारे आदिवासी बांधवांना जागतिक आदिवासी दिन व क्रांती दिनाच्या शुभेच्छा दिल्या. तसेच आदिवासी समाजाच्या प्रगतीसाठी भविष्यातही सहकार्य करण्याची भावना त्यांनी व्यक्त केली.
प्रबळमाचीतील सेवाभावी नागरिकांचा पोलिसांकडून गौरव
कार्यक्रमाचे विशेष आकर्षण ठरले ते म्हणजे प्रबळमाची परिसरातील आदिवासी बांधवांनी पर्यटकांच्या सुरक्षिततेसाठी केलेल्या उल्लेखनीय कार्याचा झालेला गौरव. पर्यटकांना अडचणीच्या प्रसंगी मदत करणे, त्यांच्या सुरक्षिततेसाठी पुढाकार घेणे आणि माणुसकीच्या भावनेतून सेवा देणे, या कार्याची दखल घेत पनवेल तालुका पोलीस ठाण्याच्या वतीने संबंधित स्थानिक नागरिकांना प्रशस्तीपत्रक व सन्मानपत्र देऊन गौरविण्यात आले.
पोलीस उपनिरीक्षक अभिजीत व्हरांबळे यांच्या हस्ते हा सन्मान प्रदान करण्यात आला. पोलिसांकडून झालेला हा गौरव संपूर्ण आदिवासी समाजासाठी अभिमानाचा आणि भावनिक क्षण ठरला.
विकासकामांसाठी पुढाकार घेण्याचे आमदारांचे आश्वासन
यावेळी आमदार विक्रांत पाटील यांनी आदिवासी बांधवांशी संवाद साधताना आदिवासी भागातील मूलभूत सुविधा, विकासकामे आणि विविध प्रलंबित प्रश्न सोडविण्यासाठी आमदार निधीतून शक्य तितका निधी उपलब्ध करून देण्यासाठी पुढाकार घेण्याचे आश्वासन दिले. शासनाच्या विविध योजनांचा लाभ आदिवासी समाजाला मिळवून देण्यासाठी पाठपुरावा करण्याची ग्वाहीही त्यांनी दिली.
व्यासपीठावरून स्वतंत्र संपादक पत्रकार संघ ऑल भारतचे संस्थापक राष्ट्रीय अध्यक्ष नामदेव शेलार यांनी आदिवासी समाजाच्या मूलभूत समस्या, हक्क, गरजा, जमीन हक्क, व्यसनमुक्ती, सामाजिक कर्तव्ये आणि शासकीय योजनांविषयी मार्गदर्शन केले. आदिवासी बांधवांना त्यांचे न्याय्य हक्क मिळवून देण्यासाठी आपण त्यांच्या सोबत असल्याचे त्यांनी सांगितले.
यावेळी समाजसेवक तथा पत्रकार संतोष चाळके आणि आदिवासी संघटनेचे नेते बी. पी. लांडगे यांनी आदिवासी समाजाच्या प्रश्नांसाठी केलेल्या कार्याचा उल्लेख करून त्यांच्या योगदानाचे कौतुक केले.
गुलाबाचे फूल देऊन आदिवासी बांधवांचा सन्मान
कार्यक्रमाचे आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे आमदार विक्रांत पाटील यांच्यासह उपस्थित मान्यवरांनी प्रत्येक आदिवासी बांधवाला गुलाबाचे फूल देऊन त्यांचे स्वागत व सन्मान केला. जागतिक आदिवासी दिन व क्रांती दिनाच्या शुभेच्छा देत आदिवासी समाजाच्या योगदानाचा गौरव करण्यात आला. या अनोख्या उपक्रमामुळे कार्यक्रमस्थळी आपुलकीचे, सन्मानाचे आणि उत्साहाचे वातावरण निर्माण झाले.
कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी स्वागताध्यक्ष संतोष चाळके, किरण शेटे, रमेश खिल्लारे, कु. राहुल गायकवाड, रतन कडू, रामा चौधरी, रत्नदीप जोशी, अमोल कांबळे, जोमा निरगुडा, परेश लोंढे, भास्कर मदे, अशोक चौधरी, सुनील भगत, राज भोईर आदींनी विशेष परिश्रम घेतले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक अॅड. मदन गोवारी यांनी केले, तर सूत्रसंचालन बी. पी. लांडगे यांनी केले.
कार्यक्रमाच्या समारोपावेळी संतोष चाळके, बी. पी. लांडगे, सौ. जोमी दामू गिरा यांच्यासह सर्व सहकारी, आयोजक, कार्यकर्ते आणि उपस्थित आदिवासी बांधवांचे मान्यवरांकडून आभार मानण्यात आले. “जय भारत! जय संविधान!! जय आदिवासी!!!” या घोषणांनी कार्यक्रमाचा उत्साहपूर्ण समारोप झाला.



No comments