web-banner-lshep2024

Breaking News

गुरुंच्या चरणीच ज्ञानाचा खरा प्रकाश; म्हसा विद्यालयात प्रेरणादायी गुरु पौर्णिमा

 

कुणाल शेलार / मुरबाड  : "गुरुशिवाय मनुष्याचे जीवन अपूर्ण आहे. जीवनाला योग्य दिशा, विचार आणि संस्कार देणारे गुरु हेच खरे मार्गदर्शक आहेत. आपण समाजात निर्माण केलेली ओळख आणि मिळविलेले यश हे गुरुकृपेचेच फलित आहे," असे प्रतिपादन वीर हुतात्मा भाई कोतवाल विद्यालय, म्हसा येथील मुख्याध्यापक तथा रंगकर्मी आनंद जाधव यांनी केले.

व्यासपौर्णिमेनिमित्त विद्यालयात आयोजित गुरु पौर्णिमा कार्यक्रमात अध्यक्षस्थानावरून ते बोलत होते. यावेळी त्यांनी विद्यार्थ्यांना गुरुंचे जीवनातील महत्त्व, संस्कारांची जपणूक आणि ज्ञानाचे मूल्य याविषयी प्रेरणादायी मार्गदर्शन केले.

कार्यक्रमात क्रीडा शिक्षक भानुदास लोहार यांनी "गुरुवंदना अर्थात गुरु माऊलींचा" हा अभंग सादर करून उपस्थितांची मने जिंकली. त्यांच्या सादरीकरणाला विद्यार्थी व शिक्षकांनी उत्स्फूर्त दाद दिली.

दरम्यान, व्यासपौर्णिमेनंतर विद्यालयात लोकमान्य बाळ गंगाधर टिळक यांच्या पुण्यतिथीनिमित्त तसेच लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या जयंतीनिमित्त संयुक्त कार्यक्रम उत्साहपूर्ण वातावरणात साजरा करण्यात आला. विद्यार्थ्यांनी भाषणे, देशभक्तिपर गीतगायन, सांस्कृतिक कार्यक्रम आणि विविध कलाविष्कार सादर करून थोर समाजपुरुषांना अभिवादन केले.

यावेळी शिक्षिका शालिनी चौधरी यांनी लोकमान्य टिळक यांच्या राष्ट्रनिर्माणातील योगदान आणि त्यांच्या विचारांची आजच्या पिढीसाठी असलेली उपयुक्तता यावर मार्गदर्शन केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन महेंद्र पष्टे, कस्तुरी आणि निधी यांनी केले. कनिष्ठ महाविद्यालयातही हा कार्यक्रम मोठ्या उत्साहात पार पडला.

या कार्यक्रमास विज्ञान शिक्षक महेंद्र जाधव, प्रा. जयेश खंडागळे, प्रा. सुनिता निपूर्ते, धनश्री साबळे, अनिता कारोटे, सचिन गवाळे, संदीप बांगर, स्वप्नील गायकर, प्रा. जगन्नाथ कथोरे, प्रा. भानुदास घागस, रणजितसिंग कच्छवा यांच्यासह विद्यालयातील शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी आणि विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.कार्यक्रमाची सांगता आभार प्रदर्शनानंतर सामूहिक 'वंदे मातरम्' गायनाने देशभक्तीपूर्ण वातावरणात करण्यात आली.

 

No comments