अमोल महाजन यांनी स्वीकारला कोकण विभागीय माहिती कार्यालयाच्या सहायक संचालक पदाचा कार्यभार
नवी मुंबई : माहिती व जनसंपर्क महासंचालनालयातील अधिकारी अमोल महाजन यांनी आज कोकण भवन, नवी मुंबई येथील विभागीय माहिती कार्यालयाच्या सहायक संचालक (माहिती) पदाचा कार्यभार स्वीकारला. या पदावर कार्यरत असलेल्या संजीवनी जाधव यांच्या बदलीनंतर हे पद रिक्त झाले होते.
कोकण विभागातील शासकीय जनसंपर्क, माहिती प्रसारण तसेच प्रसारमाध्यमांशी समन्वय साधण्याची महत्त्वपूर्ण जबाबदारी आता महाजन यांच्याकडे सोपविण्यात आली आहे. यासोबतच त्यांनी जिल्हा माहिती कार्यालय, रायगड-अलिबाग येथील माहिती अधिकारी पदाचा अतिरिक्त कार्यभारही स्वीकारत आपल्या नव्या प्रशासकीय जबाबदाऱ्यांना सुरुवात केली आहे.
अमोल महाजन यांचा शासकीय जनसंपर्क आणि माहिती प्रसारण क्षेत्रातील प्रवास अत्यंत प्रदीर्घ व उल्लेखनीय राहिला आहे. सन २००० ते २०१० या कालावधीत त्यांनी जिल्हा माहिती कार्यालय, बीड येथे सेवेला प्रारंभ करत जनसंपर्क आणि माहिती प्रसारण क्षेत्रात मोलाचे योगदान दिले. त्यानंतर २०१० ते २०११ या काळात छत्रपती संभाजीनगर येथे कार्यरत राहून विभागीय स्तरावरील प्रशासकीय अनुभव संपादन केला.
सन २०१२ ते ऑक्टोबर २०२२ या कालावधीत जिल्हा माहिती कार्यालय, जालना येथे उपसंपादक म्हणून कार्यरत असताना शासकीय प्रकाशने, वृत्तलेखन आणि कार्यालयीन प्रशासनात त्यांनी प्रभावी कामगिरी बजावली. त्यानंतर ऑक्टोबर २०२२ ते ३१ जुलै २०२६ या कालावधीत जिल्हा माहिती कार्यालय, अहिल्यानगर येथे माहिती अधिकारी म्हणून त्यांनी यशस्वी कार्यकाळ पूर्ण केला. या काळात राज्य शासनाच्या विविध लोककल्याणकारी योजनांचा प्रभावी प्रचार-प्रसार तळागाळातील नागरिकांपर्यंत पोहोचविण्यात त्यांनी महत्त्वाची भूमिका बजावली.
बीड, छत्रपती संभाजीनगर, जालना आणि अहिल्यानगर येथील समृद्ध अनुभवाच्या बळावर आता ४ ऑगस्ट २०२६ पासून त्यांनी कोकण विभागीय माहिती कार्यालयात सहायक संचालक (माहिती) म्हणून पदभार स्वीकारला आहे.
पदभार स्वीकारल्यानंतर बोलताना महाजन यांनी सांगितले की, कोकण विभागातील विकासकामे, राज्य शासनाच्या विविध योजना आणि धोरणांचा प्रचार-प्रसार अधिक प्रभावी व गतिमान करण्यास प्राधान्य देण्यात येईल. तसेच रायगड जिल्ह्याचा अतिरिक्त माहिती अधिकारी म्हणून प्रसारमाध्यमांशी अधिक सुसंवाद व समन्वय राखण्यासाठीही विशेष प्रयत्न करण्यात येतील.



No comments