नागाचा खडक पुन्हा जलमय; शाळकरी विद्यार्थ्यांची तारेवरची कसरत
गौरव शेलार / मुरबाड
:
मुरबाड शहरातील नागाचा खडक परिसरात मुसळधार पावसामुळे पुन्हा एकदा पूरस्थिती
निर्माण झाली असून,
दरवर्षीप्रमाणे यंदाही नागरिकांना मोठ्या गैरसोयीचा सामना करावा
लागत आहे. नॅशनल हायवेलगत असलेल्या या भागात रस्त्यावर पाणी साचल्याने वाहतुकीवर
परिणाम झाला असून अनेक घरांमध्येही पाणी शिरल्याचे चित्र पाहायला मिळत आहे.
पूराच्या पाण्यामुळे
शाळेत जाणाऱ्या विद्यार्थ्यांना मोठा त्रास सहन करावा लागला. काही विद्यार्थी
रस्त्याच्या एका बाजूला अडकून पडल्याचे दिसून आले. त्यामुळे विद्यार्थ्यांच्या
सुरक्षिततेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला असून, प्रशासनाच्या आपत्कालीन
नियोजनावर नागरिकांकडून प्रश्न उपस्थित केले जात आहेत.दरम्यान, गणेश नगर–देवगाव मार्गावरही नाल्याचे पाणी थेट रस्त्यावर आल्याने शाळकरी
विद्यार्थ्यांसह नागरिकांना जीव धोक्यात घालून प्रवास करावा लागला. पावसाळा सुरू
होताच अशा समस्या सातत्याने उद्भवत असल्याने कायमस्वरूपी उपाययोजना करण्याची मागणी
नागरिकांनी केली आहे.
शहरात विविध विकासकामांसाठी मोठ्या प्रमाणात निधी खर्च होत
असतानाही पूरस्थितीवर नियंत्रण मिळविण्यात प्रशासन अपयशी ठरत असल्याची भावना
स्थानिकांमध्ये व्यक्त होत आहे. निकृष्ट दर्जाची कामे आणि अपुऱ्या जलनिस्सारण
व्यवस्थेमुळे दरवर्षी तीच परिस्थिती निर्माण होत असल्याचा आरोप काही नागरिकांनी
केला आहे. त्यामुळे संबंधित कामांची गुणवत्ता, नियोजन आणि जबाबदार
यंत्रणांची चौकशी करून दोषींवर कारवाई करण्याची मागणी आता जोर धरू लागली आहे.



No comments