मुरबाडच्या बागेश्वरी तलावाच्या संरक्षण भिंतीला गोट्याचे कवच; सत्ताधाऱ्यांचे की विरोधी नेतेगिरीचे? निकृष्ट साहित्याच्या वापराचा आरोप
गौरव शेलार / मुरबाड
: मुरबाड शहरातील बागेश्वरी तलावाच्या संरक्षणासाठी उभारण्यात येत असलेल्या गॅबियन
संरक्षण भिंतीच्या कामावरून आता शहरात चर्चांना उधाण आले आहे. या कामामध्ये
निकृष्ट दर्जाचे साहित्य वापरले जात असल्याचा आरोप नागरिकांकडून होत असून, या माध्यमातून सार्वजनिक निधीचा अपव्यय तर होत नाही ना, असा सवालही उपस्थित केला जात आहे.
तलावाच्या
संरक्षणासाठी गोटे, जाळी आणि इतर साहित्याचा वापर
करून गॅबियन पद्धतीची भिंत उभारण्यात येत आहे. मात्र, या
कामाचा दर्जा, वापरण्यात येणारे साहित्य, कामाची प्रत्यक्ष किंमत आणि मंजूर अंदाजपत्रक याबाबत पारदर्शकता असणे
गरजेचे असल्याचे नागरिकांचे म्हणणे आहे.
दरम्यान, या कामाच्या ठेकेदारीवरून मुरबाडच्या राजकीय वर्तुळात आणखी एका चर्चेला
तोंड फुटले आहे. कालपर्यंत सत्ताधारी लोकप्रतिनिधींच्या विरोधात भूमिका घेणाऱ्या
एका व्यक्तीचा किंवा विरोधी गटाशी संबंधित व्यक्तीचा या कामाशी संबंध आहे का?
अशी चर्चा शहरात सुरू असल्याचे बोलले जात आहे.
यामुळेच या गॅबियन संरक्षण भिंतीला "गोट्याचे कवच नेमके कोणाचे सत्ताधाऱ्यांचे की विरोधी नेतेगिरीचे?" असा उपरोधिक सवाल नागरिकांमध्ये चर्चिला जात आहे.राजकीय विरोधाची भूमिका घेणाऱ्या व्यक्तीला विकासकामांच्या माध्यमातून जवळ केले जात आहे का, अथवा संबंधित व्यक्तीला शांत करण्यासाठी कामाचा मार्ग उपलब्ध करून दिला जात आहे का, याबाबतही कुजबुज सुरू आहे. मात्र, या चर्चांना अधिकृत दुजोरा मिळालेला नाही.
कामाची चौकशी होणार का?
सार्वजनिक निधीतून
होणाऱ्या या कामामध्ये मंजूर अंदाजपत्रकानुसार साहित्य वापरले जात आहे का, कामाची गुणवत्ता तपासण्यात आली आहे का, कामाचे
मोजमाप आणि देयके कशा पद्धतीने करण्यात येणार आहेत, तसेच
संबंधित ठेकेदाराची निवड कोणत्या प्रक्रियेतून झाली, याची
माहिती प्रशासनाने सार्वजनिक करावी, अशी मागणी नागरिकांकडून
होत आहे.
विशेष म्हणजे, संरक्षण भिंतीचे काम भविष्यात तलावाच्या सुरक्षिततेसाठी कितपत प्रभावी
ठरणार आहे, हा देखील महत्त्वाचा प्रश्न आहे. केवळ गोटे रचून
भिंत उभारण्यापेक्षा त्यामागील तांत्रिक निकष, पाया, जाळीची गुणवत्ता आणि वापरलेल्या साहित्याची मजबुती यांची स्वतंत्र
तांत्रिक तपासणी होणे आवश्यक असल्याचे जाणकारांचे मत आहे.
आता प्रशासन या
कामाची प्रत्यक्ष पाहणी करून गुणवत्ता तपासणार का? कामाचा
खर्च आणि ठेकेदाराची माहिती जाहीर करणार का? तसेच राजकीय
चर्चांना पूर्णविराम देण्यासाठी या कामाची पारदर्शक चौकशी करणार का? याकडे मुरबाडकरांचे लक्ष लागले आहे.



No comments