web-banner-lshep2024

Breaking News

मुरबाडमध्ये बोगस पत्रकार व बनावट लोगो लावलेल्या वाहनांवर कारवाईची मागणी; अनाधिकृत वाहन पार्किंगवर पोलिसांची कारवाई

 

मुरबाड : शहरात अनधिकृत वाहन पार्किंगविरोधात पोलिसांनी सुरू केलेल्या विशेष कारवाईचे नागरिकांकडून स्वागत होत असतानाच, शहरात व तालुक्यात बोगस पत्रकार तसेच वाहनांवर "पोलीस", "पत्रकार", "महाराष्ट्र शासन", "आमदार", "खासदार" अशा विविध पदांचे नाव व लोगो लावून बेकायदेशीरपणे फिरणाऱ्या वाहनांवरही कठोर कारवाई करण्याची मागणी जोर धरू लागली आहे.

स्वतंत्र संपादक पत्रकार संघाने याबाबत म्हटले आहे की, मुरबाड शहर व तालुक्यात काही व्यक्ती स्वतःला पत्रकार म्हणून वावरत असून वाहनांवर विविध प्रकारचे स्टिकर्स व लोगो लावून सामान्य नागरिकांवर प्रभाव टाकण्याचा प्रयत्न करीत आहेत. अशा प्रकारामुळे खऱ्या पत्रकारांची प्रतिमा मलीन होत असून पत्रकारितेच्या विश्वासार्हतेलाही धक्का बसत आहे.

संघाच्या म्हणण्यानुसार, पत्रकार म्हणून कार्य करणाऱ्या व्यक्तीकडे संबंधित नोंदणीकृत वृत्तपत्र किंवा वृत्तवाहिनीचे अधिकृत ओळखपत्र, आवश्यक कागदपत्रे व नियमांनुसार वैध मान्यता असणे गरजेचे आहे. तसेच संबंधित माध्यम संस्था कायदेशीररित्या नोंदणीकृत असल्यास आवश्यक वैधानिक प्रक्रिया पूर्ण केलेली आहे का, याचीही पडताळणी करण्यात यावी, अशी मागणी करण्यात आली आहे.

याशिवाय, वाहनांवर "पोलीस", "पत्रकार", "महाराष्ट्र शासन", "आमदार", "खासदार" अशा पदनामांचा किंवा अधिकृततेचा आभास निर्माण करणारे स्टिकर्स, लोगो किंवा फलक लावून नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांची चौकशी करून त्यांच्यावर कायदेशीर कारवाई करण्यात यावी, अशीही मागणी करण्यात आली आहे.

स्वतंत्र संपादक पत्रकार संघाने पोलिस प्रशासन व संबंधित यंत्रणांनी या प्रकरणाची सखोल चौकशी करून बोगस पत्रकार आणि बनावट ओळख वापरणाऱ्या व्यक्तींवर तातडीने कठोर कारवाई करावी, अशी मागणी केली आहे. शहरातील नागरिकांनीही अशा कारवाईची व्याप्ती वाढवून सर्व प्रकारच्या बेकायदेशीर कृत्यांवर समान निकषांवर कारवाई व्हावी, अशी अपेक्षा व्यक्त केली आहे.

 

No comments