web-banner-lshep2024

Breaking News

तीन हात नाका' प्रकाशमय की निधीचा अंधार? डिझाईन स्ट्रीट लाईटमुळे खर्चावर प्रश्नचिन्ह

गौरव शेलार / मुरबाड : मुरबाड शहरातील महत्त्वाचा समजला जाणारा तीन हात नाका – शहापूर हायवे परिसर प्रकाशमय करण्याच्या उद्देशाने बसविण्यात आलेल्या स्ट्रीट लाईट पोलच्या कामावर आता प्रश्नचिन्ह उपस्थित होऊ लागले आहे. संबंधित ठिकाणी उभारण्यात आलेले पोल हे पारंपरिक रस्ते प्रकाशयोजनेसाठी वापरल्या जाणाऱ्या पोलऐवजी सजावटीच्या (डिझाईन) प्रकारातील असल्याचे नागरिकांचे म्हणणे असून, त्यामुळे खर्च आणि कामाच्या उपयुक्ततेबाबत चर्चा रंगली आहे.

स्थानिकांच्या म्हणण्यानुसार, या पोलवर बसविण्यात आलेल्या दिव्यांचा प्रकाश अत्यंत कमी असून, तो 'झिरो बल्ब' इतकाच उजेड देत असल्याची भावना व्यक्त केली जात आहे. त्यामुळे रस्ता सुरक्षित व प्रकाशमान होण्याऐवजी केवळ नावालाच प्रकाशयोजना करण्यात आल्याची टीका होत आहे.

विशेष म्हणजे, अशा प्रकारचे पोल साधारणतः उद्यान, बगीचे किंवा सौंदर्यीकरणाच्या ठिकाणी बसवले जातात. मात्र तेच पोल शहापूर हायवेवरील तीन हात नाका या महत्त्वाच्या वाहतूक मार्गावर उभारण्यात आल्याने त्यांच्या निवडीमागील निकष काय, असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.

या ठिकाणी सुमारे पाच ते सहा पोल बसविण्यात आले असून, त्यांचा प्रत्यक्षात रस्ते प्रकाशयोजनेसाठी किती उपयोग होत आहे, याबाबत नागरिकांनी शंका व्यक्त केली आहे. "अधिक खर्च दाखविण्यासाठीच हे डिझाईन पोल बसविण्यात आले का?" अशी चर्चा शहरात सुरू असून, या कामाच्या तांत्रिक मंजुरीसह खर्चाचा तपशील सार्वजनिक करण्याची मागणी होत आहे.

स्थानिक नागरिकांचे म्हणणे आहे की, सार्वजनिक निधीचा वापर करताना सुरक्षितता, उपयुक्तता आणि गुणवत्तेला प्राधान्य दिले गेले पाहिजे. मात्र संबंधित कामात त्याऐवजी अनावश्यक खर्च झाल्याची भावना निर्माण होत आहे. या प्रकरणाकडे संबंधित विभागाने गांभीर्याने लक्ष देऊन वस्तुस्थिती स्पष्ट करावी, तसेच आवश्यक असल्यास तांत्रिक चौकशी करून सार्वजनिक निधीचा अपव्यय टाळावा, अशी मागणी नागरिकांकडून होत आहे.

 

No comments