नागरिकांच्या मागणीला यश कल्याण–मुरबाड मार्गावर एसटी फेऱ्यांमध्ये मोठी वाढ; 48 वरून थेट 108 फेऱ्या परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांचा महत्त्वपूर्ण निर्णय
गौरव शेलार / मुरबाड : कल्याण–मुरबाड मार्गावरील दिवसेंदिवस वाढत असलेली प्रवाशांची गर्दी लक्षात घेऊन राज्याचे परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे. या मार्गावरील एसटी बस फेऱ्यांची संख्या 48 वरून थेट 108 करण्यात येणार असून, त्यामुळे दररोज प्रवास करणाऱ्या हजारो प्रवाशांना मोठा दिलासा मिळणार आहे.
कल्याण–मुरबाड हा मार्ग शालेय, महाविद्यालयीन विद्यार्थी, नोकरदार, व्यापारी तसेच ग्रामीण भागातील नागरिकांसाठी अत्यंत महत्त्वाचा मानला जातो. मात्र, अपुऱ्या फेऱ्यांमुळे प्रवाशांना गर्दी, उशीर आणि गैरसोयीचा सामना करावा लागत होता. या पार्श्वभूमीवर प्रवाशांकडून सातत्याने अतिरिक्त फेऱ्यांची मागणी केली जात होती.
परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी या मागणीची दखल घेत एसटी प्रशासनाला फेऱ्यांमध्ये मोठी वाढ करण्याचे निर्देश दिले. त्यानुसार आता या मार्गावर 108 फेऱ्या सुरू करण्यात येणार आहेत. त्यामुळे बसची प्रतीक्षा कमी होण्यास, गर्दीवर नियंत्रण मिळण्यास आणि प्रवाशांचा वेळ वाचण्यास मोठी मदत होणार आहे.
या निर्णयाचे कल्याण, मुरबाड आणि परिसरातील नागरिकांनी स्वागत केले असून, ग्रामीण भागातील सार्वजनिक वाहतूक अधिक सक्षम करण्याच्या दृष्टीने हा निर्णय महत्त्वपूर्ण ठरणार असल्याची प्रतिक्रिया प्रवाशांकडून व्यक्त केली जात आहे.



No comments