web-banner-lshep2024

Breaking News

मुरबाडच्या १७ प्रभागांपैकी १६ प्रभागांत निधीचा पाऊस; प्रभाग क्रमांक 1 मात्र विकासापासून वंचित?

गौरव शेलार / मुरबाड : मुरबाड शहरातील विकासकामांना विविध प्रभागांमध्ये मोठ्या प्रमाणात निधी उपलब्ध होत असताना, शहरातील प्रभाग क्रमांक 1 मात्र निधीच्या प्रतीक्षेत असल्याची भावना नागरिकांमधून व्यक्त होत आहे. शहरातील १७ प्रभागांपैकी तब्बल १६ प्रभागांमध्ये विविध विकासकामांसाठी भरघोस निधी उपलब्ध झाल्याचे चित्र असताना, प्रभाग क्रमांक 1 वर मात्र निधीने पाठ फिरवली का? असा सवाल आता नागरिकांकडून उपस्थित केला जात आहे.

प्रभाग क्रमांक 1 मध्ये रस्ते, गटारी, स्ट्रीट लाईट, वीजपोल तसेच इतर मूलभूत विकासकामांची आवश्यकता असल्याचे नागरिकांचे म्हणणे आहे. काही ठिकाणी पायाभूत सुविधांचा अभाव जाणवत असल्याने नागरिकांना दैनंदिन अडचणींचा सामना करावा लागत असल्याची खंत व्यक्त होत आहे.

एकीकडे शहरातील इतर प्रभागांमध्ये विकासकामांसाठी निधीचा ओघ वाढत असताना, दुसरीकडे प्रभाग क्रमांक 1 मधील नागरिकांना मात्र निधीची प्रतीक्षा का करावी लागत आहे, असा प्रश्न उपस्थित होत आहे. विकासाच्या बाबतीत सर्व प्रभागांना समान न्याय मिळणार की निधीवाटपात काही प्रभागांना प्राधान्य आणि काहींना उपेक्षा? अशी चर्चा आता नागरिकांमध्ये सुरू झाली आहे.

प्रभाग क्रमांक 1 मधील रस्त्यांची दुरवस्था, गटारींची समस्या, अपुरा स्ट्रीट लाईटचा प्रश्न आणि आवश्यक ठिकाणी पोल नसल्याने नागरिकांच्या सुरक्षिततेचाही प्रश्न निर्माण होत असल्याचे नागरिक सांगतात.शहरातील इतर भागांमध्ये विकासकामांचा धडाका सुरू असताना आमच्या प्रभागाच्या वाट्याला निधी का येत नाही?” असा सवाल नागरिकांकडून उपस्थित केला जात असून, संबंधित प्रशासन आणि लोकप्रतिनिधींनी याकडे गांभीर्याने लक्ष देण्याची मागणी होत आहे.

आता मात्र प्रभाग क्रमांक 1 च्या विकासासाठी स्वतंत्र निधीची तरतूद कधी होणार आणि रखडलेल्या मूलभूत सुविधांना गती कधी मिळणार याकडे नागरिकांचे लक्ष लागले आहे.

No comments