दुर्गम सोनगावच्या शाळेत भार्गवीने इंग्रजी भाषणातून फुलवला स्वातंत्र्याचा संदेश
गौरव
शेलार / मुरबाड : “ज्ञान दिल्याने ज्ञान
वाढते, ज्ञानाचे हे मंदिर आहे; इथे मोल
न दामाचे, घामाचे मोती होतील” या विचाराला सार्थ ठरवत मुरबाड
तालुक्यातील दुर्गम भागातील जि. प. शाळा, सोनगाव येथील
इयत्ता तिसरीतील विद्यार्थिनी कुमारी भार्गवी तुकाराम पवार हिने स्वातंत्र्य
दिनानिमित्त अतिशय सुंदर, प्रभावी आणि आत्मविश्वासपूर्ण
इंग्रजी भाषण सादर करून उपस्थितांची मने जिंकली.
मराठी
माध्यमाच्या या शाळेतील भार्गवीने आपल्या ओघवत्या इंग्रजी वक्तृत्वातून भारतीय
स्वातंत्र्याचा इतिहास, देशप्रेम आणि
देशाच्या भविष्यातील नागरिक म्हणून विद्यार्थ्यांची जबाबदारी यांचा प्रभावी संदेश
उपस्थितांसमोर मांडला. तिच्या वयाच्या मानाने असलेला आत्मविश्वास, स्पष्ट उच्चार आणि भाषणातील प्रभावी मांडणी यामुळे तिचे विशेष कौतुक
करण्यात आले.
दुर्गम
आणि ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांमध्येही गुणवत्ता,
आत्मविश्वास आणि प्रतिभा मोठ्या प्रमाणात दडलेली असते, याचे भार्गवीचे हे भाषण प्रेरणादायी उदाहरण ठरले आहे. योग्य मार्गदर्शन
आणि प्रोत्साहन मिळाल्यास ग्रामीण भागातील विद्यार्थीही कोणत्याही क्षेत्रात
उल्लेखनीय कामगिरी करू शकतात, हे या छोट्या विद्यार्थिनीने
आपल्या भाषणातून दाखवून दिले.
भार्गवीच्या
या उल्लेखनीय कामगिरीमागे शाळेतील वरिष्ठ शिक्षक श्री. जगदीश रघुनाथ सूर्यराव तसेच
सहशिक्षक श्री. नंदकुमार भांडे सर यांचे मार्गदर्शन,
मेहनत आणि सातत्यपूर्ण परिश्रम मोलाचे ठरले. शिक्षकांच्या
मार्गदर्शनातून विद्यार्थ्यांच्या अंगी असलेल्या सुप्त गुणांना व्यासपीठ मिळाल्यास
त्यातून अशाच प्रकारची प्रतिभा पुढे येते, याचा प्रत्यय
सोनगावच्या या विद्यार्थिनीने दिला.
स्वातंत्र्य
दिनाच्या निमित्ताने एका दुर्गम भागातील मराठी माध्यमाच्या शाळेतील तिसरीच्या
विद्यार्थिनीने इंग्रजी भाषेत आत्मविश्वासाने केलेले हे भाषण निश्चितच सोनगावच्या
शाळेसाठी आणि संपूर्ण मुरबाड तालुक्यासाठी अभिमानाची बाब ठरले आहे.



No comments