बंद पडलेल्या वृत्तपत्रांचा ‘एआय’च्या माध्यमातून पुन्हा उदय? खोट्या आरएनआय क्रमांकाचा वापर!
गौरव शेलार / ठाणे : बंद पडलेल्या अथवा अस्तित्वात नसलेल्या काही वृत्तपत्रांचा एआय (कृत्रिम बुद्धिमत्ता) तंत्रज्ञानाच्या माध्यमातून पुन्हा वापर केला जात असल्याचा आरोप समोर आला आहे. काही ठिकाणी खोट्या आरएनआय क्रमांकाचा वापर करून वृत्तपत्राच्या धर्तीवर कात्रणे तयार केली जात असल्याने पत्रकारिता क्षेत्रातही चिंता व्यक्त होत आहे.
एआय तंत्रज्ञानाचा गैरवापर करून तयार केलेल्या अशा बनावट वृत्तपत्र कात्रणांमुळे अधिकारी, कर्मचारी तसेच सर्वसामान्य नागरिकांमध्ये संभ्रम निर्माण होण्याची शक्यता आहे. अधिकृत वृत्तपत्राची ओळख, नोंदणीची वैधता आणि बातमीचा अधिकृत स्रोत यांची खात्री न करता अशा कात्रणांना महत्त्व देणे प्रशासनासाठीही अडचणीचे ठरू शकते.
स्वतंत्र संपादक पत्रकार संघ भारत यांनी या प्रकाराची गंभीर दखल घेतली असून, अधिकारी व कर्मचाऱ्यांनी अशा कथित बनावट एआय-निर्मित वृत्तपत्र कात्रणांना घाबरून न जाता त्यांची सत्यता तपासावी, अशी अपेक्षा व्यक्त केली आहे.
विशेषतः आरएनआय क्रमांक, वृत्तपत्राची नोंदणी, प्रकाशनाची नियमितता आणि संबंधित वृत्तपत्राची अधिकृत ओळख यांची पडताळणी केल्यानंतरच कोणत्याही बातमीची दखल घ्यावी, असे संघटनेने म्हटले आहे.
एआय तंत्रज्ञानाचा पत्रकारितेच्या सकारात्मक वापरासाठी उपयोग होऊ शकतो; मात्र त्याच तंत्रज्ञानाचा वापर करून बनावट वृत्तपत्रे, खोटी कात्रणे किंवा दिशाभूल करणाऱ्या बातम्या तयार केल्या जात असतील, तर हा प्रकार पत्रकारितेच्या विश्वासार्हतेसाठी गंभीर आव्हान ठरू शकतो. त्यामुळे प्रशासनाने अशा प्रकरणांकडे तथ्यांच्या आधारे आणि अधिकृत पडताळणीनंतरच पाहावे, अशी अपेक्षा संघटनेने व्यक्त केली आहे.



No comments