गोवेली येथे जनता दरबाराला उत्स्फूर्त प्रतिसाद; नागरिकांच्या समस्या थेट आमदार कथोरे यांच्यासमोर
गौरव शेलार / कल्याण : नागरिकांच्या विविध समस्या, अडचणी आणि प्रलंबित प्रश्न जाणून घेऊन त्यावर तातडीने तोडगा काढण्यासाठी कल्याण ग्रामीण तालुक्यातील गोवेली येथे जनता दरबाराचे आयोजन करण्यात आले. या जनता दरबाराला परिसरातील नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहत आपल्या भागातील विविध प्रश्न थेट आमदार किसन कथोरे यांच्यासमोर मांडले. नागरिकांच्या समस्या ऐकून घेत त्यावर संबंधित विभागाच्या अधिकाऱ्यांकडून तातडीने माहिती जाणून घेतल्याने नागरिकांमध्ये समाधानाचे वातावरण निर्माण झाले.
गोवेली परिसरातील नागरिकांनी रस्ते, पाणी, वीज, आरोग्य, शासकीय योजना, नागरी सुविधा तसेच विविध विभागांशी संबंधित प्रश्न आमदार कथोरे यांच्यासमोर मांडले. नागरिकांनी मांडलेल्या प्रत्येक प्रश्नाची गांभीर्याने दखल घेत आमदार किसन कथोरे यांनी संबंधित विभागाचे अधिकारी व कर्मचारी यांच्याकडून समस्यांची वस्तुस्थिती जाणून घेतली. तसेच नागरिकांच्या अडचणींचे प्राधान्याने निराकरण करण्यासाठी आवश्यक त्या सूचना संबंधित अधिकाऱ्यांना दिल्या.
यावेळी नागरिकांशी संवाद साधताना आमदार किसन कथोरे म्हणाले की, “जनता दरबार हा नागरिकांच्या समस्या थेट जाणून घेण्याचे प्रभावी माध्यम आहे. नागरिकांनी मांडलेल्या प्रत्येक प्रश्नाची गांभीर्याने दखल घेऊन तो प्रश्न संबंधित विभागाच्या माध्यमातून सोडविण्यासाठी माझा सातत्याने पाठपुरावा असतो.”
नागरिकांना आपल्या समस्या मांडण्यासाठी प्रशासनाच्या कार्यालयांचे उंबरठे वारंवार झिजवावे लागू नयेत, यासाठी लोकप्रतिनिधी म्हणून नागरिकांशी थेट संवाद साधणे महत्त्वाचे असल्याचेही आमदार कथोरे यांनी सांगितले. जनता दरबाराच्या माध्यमातून नागरिक आणि प्रशासन यांच्यात थेट समन्वय निर्माण होत असून, अनेक प्रश्नांवर तातडीने कार्यवाही करण्यास मदत होत असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
“आपल्या मतदारसंघातील प्रत्येक नागरिकाला आवश्यक त्या मूलभूत सुविधा मिळाव्यात, त्यांच्या समस्या वेळेत मार्गी लागाव्यात आणि कोणत्याही नागरिकाला आपल्या हक्काच्या सुविधेसाठी अडचणींचा सामना करावा लागू नये, यासाठी मी सदैव कटिबद्ध आहे,” असे प्रतिपादन आमदार किसन कथोरे यांनी यावेळी केले.
दरम्यान, गोवेली येथे आयोजित करण्यात आलेल्या या जनता दरबारामुळे नागरिकांना आपल्या समस्या थेट आमदारांसमोर मांडण्याची संधी मिळाली. संबंधित अधिकाऱ्यांकडून समस्यांची माहिती घेऊन त्यावर आवश्यक सूचना देण्यात आल्याने नागरिकांच्या प्रलंबित प्रश्नांना आता गती मिळण्याची अपेक्षा व्यक्त होत आहे. नागरिकांच्या प्रश्नांवर केवळ चर्चा न करता त्यांचा पाठपुरावा करून प्रत्यक्ष तोडगा काढण्यावर भर राहणार असल्याचा विश्वास आमदार कथोरे यांनी यावेळी व्यक्त केला.



No comments