नैसर्गिक शेतीला चालना; उशिद येथे जैविक निविष्ठा केंद्राचे उद्घाटन
गौरव शेलार / कल्याण : नैसर्गिक शेतीला प्रोत्साहन देत शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढविण्याच्या दिशेने आणखी एक महत्त्वपूर्ण पाऊल उचलण्यात आले आहे. उशिद, ता. कल्याण येथे जैविक निविष्ठा केंद्राचे उद्घाटन करण्यात आले. यावेळी आमदार किसन कथोरे यांनी उपस्थित राहून केंद्राची पाहणी केली.रासायनिक शेतीवरील अवलंबित्व कमी करून नैसर्गिक व शाश्वत शेतीला प्रोत्साहन देणे, शेतकऱ्यांना जैविक निविष्ठा सहज उपलब्ध करून देणे आणि उत्पादन खर्च कमी करण्याच्या दृष्टीने हे केंद्र उपयुक्त ठरणार असल्याचे यावेळी सांगण्यात आले.
यावेळी आमदार किसन कथोरे यांनी परिसरातील सुरण लागवडीची पाहणी करून शेतकऱ्यांशी संवाद साधला. सुरणासह विविध पिकांच्या लागवडीबाबत शेतकऱ्यांकडून माहिती जाणून घेत उत्पादन, बाजारपेठ, खर्च तसेच उत्पन्न याबाबत चर्चा करण्यात आली.शाश्वत शेती ही काळाची गरज असून शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढविण्यासाठी नैसर्गिक शेतीला अधिकाधिक प्रोत्साहन देणे आवश्यक आहे. शेतकऱ्यांच्या अडचणी सोडविण्यासाठी आणि त्यांच्या प्रगतीसाठी आपण सदैव तत्पर आहोत, अशी भावना आमदार किसन कथोरे यांनी व्यक्त केली.
जैविक निविष्ठा केंद्रामुळे परिसरातील शेतकऱ्यांना नैसर्गिक शेतीसाठी आवश्यक साहित्य उपलब्ध होण्यास मदत होणार असून, उत्पादन खर्च कमी करण्यासोबतच जमिनीची सुपीकता आणि पर्यावरणाचे संवर्धन करण्यासही हातभार लागणार आहे.या उपक्रमामुळे उशिद परिसरात नैसर्गिक शेती, शाश्वत उत्पादन आणि शेतकऱ्यांचे वाढते उत्पन्न यासाठी सकारात्मक वातावरण निर्माण होण्याची अपेक्षा व्यक्त करण्यात येत आहे.



No comments