मुरबाड आगारात एनसीएमसी कार्डची सुविधा; प्रवाशांच्या मदतीला नकुल धस तत्पर
गौरव शेलार / मुरबाड : महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाकडून प्रवाशांच्या प्रवासाला अधिक सुलभता आणि आधुनिकता आणण्यासाठी नॅशनल कॉमन मोबिलिटी कार्ड (NCMC) सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. मुरबाड तालुक्यातही या सुविधेला प्रवाशांकडून चांगला प्रतिसाद मिळत असून, आतापर्यंत साधारण चार ते पाच हजार एनसीएमसी कार्ड उपलब्ध करून देण्यात आल्याची माहिती आहे.
एनसीएमसी कार्डच्या माध्यमातून प्रवाशांना प्रवासादरम्यान रोख रकमेऐवजी कार्डचा वापर करता येत असल्याने ही सुविधा नागरिकांसाठी सोयीची ठरत आहे. मात्र नवीन सुविधा असल्याने अनेक प्रवाशांना कार्डचा वापर, रिचार्ज प्रक्रिया आणि इतर तांत्रिक बाबींबाबत मार्गदर्शनाची आवश्यकता भासत असते.
ही गरज लक्षात घेऊन मुरबाड आगारातील कर्मचारी नकुल धस हे प्रवाशांना सातत्याने मार्गदर्शन करताना दिसत आहेत. प्रवाशांना एनसीएमसी कार्डची माहिती देणे, कार्ड रिचार्ज करून देणे, कार्ड वापरण्याची पद्धत समजावून सांगणे तसेच कार्डशी संबंधित अडचणी सोडविण्यासाठी मदत करणे, अशी विविध कामे ते तत्परतेने करत आहेत.
विशेषतः महिला प्रवासी, ज्येष्ठ नागरिक आणि शालेय विद्यार्थ्यांना एनसीएमसी कार्डचा वापर करताना कोणतीही अडचण येऊ नये यासाठी नकुल धस यांच्याकडून सहकार्य केले जात असल्याचे प्रवाशांकडून सांगण्यात येत आहे.
शासकीय किंवा सार्वजनिक सेवा केवळ सुविधा उपलब्ध करून देण्यापुरती मर्यादित न राहता ती नागरिकांपर्यंत योग्य पद्धतीने पोहोचविण्यासाठी कर्मचाऱ्यांची भूमिका महत्त्वाची असते. मुरबाड आगारात एनसीएमसी कार्डसंदर्भात प्रवाशांना मिळणाऱ्या मार्गदर्शनामुळे या आधुनिक सुविधेचा लाभ घेणे नागरिकांसाठी अधिक सोपे होत असल्याचे चित्र आहे.
प्रवाशांच्या अडचणी समजून घेत त्यांना तत्परतेने मदत करणाऱ्या नकुल धस यांच्या सेवाभावी कार्याचे प्रवाशांकडून कौतुक होत असून, अशाच प्रकारची प्रवासी-केंद्रित सेवा सातत्याने मिळावी, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे.



No comments