web-banner-lshep2024

Breaking News

चार अल्पवयीन मुलींची सुखरूप सुटका; उत्कृष्ट तपासाबद्दल पोलीस अधिकाऱ्यांचा गौरव

 

कुणाल शेलार / मुरबाड : ठाणे शहर पोलीस आयुक्तालयाच्या अंतर्गत बाजारपेठ पोलीस ठाणे, कल्याण येथे कार्यरत सहाय्यक पोलीस निरीक्षक श्रीमती.स्मिता संतोष सुरवसे, श्रीमती.अंबिका गस्ते यांच्यासह पथकाने चार अल्पवयीन मुलींच्या प्रकरणाचा तांत्रिक व कौशल्यपूर्ण तपास करून त्यांची सुखरूप सुटका करण्यात महत्त्वपूर्ण भूमिका बजावली.या उल्लेखनीय कामगिरीबद्दल ठाणे शहर पोलीस आयुक्त आशुतोष डुंबरे यांच्या वतीने व कल्याण बाजारपेठ पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक गणेश न्यायदे यांच्या मार्गदर्शनाखाली प्रशस्तीपत्र देऊन गौरविण्यात आले आहे.

बाजारपेठ पोलीस ठाण्याच्या हद्दीत चार अल्पवयीन मुलींना अज्ञात व्यक्तीने आमिष दाखवून पळवून नेल्याबाबत तक्रारी प्राप्त झाल्या होत्या. याप्रकरणी बाजारपेठ पोलीस ठाण्यात भा.न्या.सं. कलम १३७(२) अन्वये अनुक्रमे गुन्हा रजि. नं. १९४/२०२६, १९५/२०२६, १९६/२०२६ व १९७/२०२६ असे चार स्वतंत्र गुन्हे दाखल करण्यात आले होते.

प्रकरणाचे गांभीर्य लक्षात घेऊन पोलिसांनी तातडीने तपासाची चक्रे फिरवली. अपहृत मुलींकडील मोबाईल क्रमांकाच्या आधारे तांत्रिक तपास करण्यात आला. उपलब्ध तांत्रिक माहिती व कौशल्यपूर्ण तपासाच्या आधारे मुली राजस्थानातील पाली येथे असल्याचे पोलिसांच्या निदर्शनास आले.

त्यानंतर बाजारपेठ पोलीस ठाण्याचे पोलीस पथक राजस्थान येथे रवाना करण्यात आले. पोलिसांनी अथक प्रयत्न करून मारवाड रेल्वे स्टेशन, राजस्थान येथून चारही अल्पवयीन मुलींचा शोध घेत त्यांना सुखरूप ताब्यात घेतले. त्यानंतर त्यांना सुरक्षितपणे महाराष्ट्रात आणून त्यांच्या पालकांच्या ताब्यात देण्यात आले.

अल्पवयीन मुलींचा शोध घेण्यासाठी करण्यात आलेला तांत्रिक तपास, पोलिसांनी दाखविलेली तत्परता आणि राजस्थानपर्यंत जाऊन मुलींची सुखरूप सुटका करण्याची कामगिरी उल्लेखनीय ठरली. या उत्कृष्ट कामगिरीची दखल घेत पोलीस आयुक्त आशुतोष डुंबरे यांच्या वतीने व बाजारपेठ पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक गणेश न्यायदे यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक श्रीमती.स्मिता संतोष सुरवसे, श्रीमती.अंबिका गस्ते यांना प्रशस्तीपत्र देऊन त्यांच्या धाडसी कार्याचे कौतुक केले.

या कामगिरीमुळे बाजारपेठ पोलिसांची कार्यतत्परता, तांत्रिक तपासातील कौशल्य आणि नागरिकांच्या सुरक्षिततेप्रती असलेली बांधिलकी अधोरेखित झाली आहे. भविष्यातही अशाच प्रकारे उत्कृष्ट कामगिरी बजावून पोलीस खात्याची प्रतिमा उंचावत राहील,असा विश्वास पोलीस आयुक्तांनी व्यक्त केला आहे.

No comments