श्रावणाच्या प्रारंभी श्री तीर्थक्षेत्र संगम येथे महादेवाचे दर्शन; विकासकामांना गती देण्याच्या आमदार किसन कथोरे यांच्या सूचना
गौरव शेलार / मुरबाड : पवित्र श्रावण महिन्याच्या प्रारंभी मुरबाड तालुक्यातील श्री तीर्थक्षेत्र संगम येथील प्राचीन महादेव मंदिरात भगवान शिवशंकराचे मनोभावे दर्शन घेत विधिवत पूजा-अर्चना करण्यात आली. यावेळी आमदार किसन कथोरे यांनी भगवान महादेवाचे आशीर्वाद घेत मुरबाड तालुक्याच्या सर्वांगीण विकासासाठी प्रार्थना करण्यात आली.
श्रावण महिन्याच्या पहिल्याच दिवशी झालेल्या या धार्मिक भेटीदरम्यान श्री तीर्थक्षेत्र संगम परिसरात सुरू असलेल्या विविध विकासकामांची पाहणी करण्यात आली. संबंधित विभागाच्या अधिकारी व कर्मचाऱ्यांकडून सुरू असलेल्या कामांची सविस्तर माहिती घेऊन कामांच्या प्रगतीचा आढावा घेण्यात आला.विकासकामे दर्जेदार पद्धतीने, नियोजनबद्धरीत्या आणि निर्धारित वेळेत पूर्ण करण्याच्या स्पष्ट सूचना संबंधित अधिकाऱ्यांना देण्यात आल्या. भाविकांची वाढती संख्या लक्षात घेता मंदिर परिसरात आवश्यक नागरी सुविधा, स्वच्छता, सुरक्षितता तसेच भाविकांसाठी सोयी-सुविधा उपलब्ध करून देण्यावर विशेष भर देण्यात येणार असल्याचे यावेळी आमदार किसन कथोरे यांनी सांगितले.
श्री तीर्थक्षेत्र संगम हे मुरबाड तालुक्यातील महत्त्वाचे धार्मिक स्थळ आहे. त्यामुळे या परिसराचा विकास करताना केवळ पायाभूत सुविधा उभारण्याऐवजी या तीर्थक्षेत्राचे धार्मिक महत्त्व, नैसर्गिक सौंदर्य आणि पर्यावरणीय समतोल जपण्याला प्राधान्य दिले जाणार आहे.
तीर्थक्षेत्र संगमच्या सर्वांगीण विकासासाठी आवश्यक त्या उपाययोजना सातत्याने राबविण्यात येत असून, भाविकांना अधिक चांगल्या सुविधा मिळाव्यात आणि या परिसराला पर्यटनाच्या दृष्टीनेही नवी ओळख मिळावी, यासाठी प्रयत्न सुरू आहेत.“भगवान महादेवाच्या आशीर्वादाने मुरबाड तालुक्याच्या विकासाचा प्रवास अधिक गतिमान करण्यासाठी सदैव कटिबद्ध असून, श्री तीर्थक्षेत्र संगमचा सर्वांगीण विकास करण्यासाठी आवश्यक ती सर्व पावले उचलली जातील,” असा विश्वास यावेळी आमदार किसन कथोरे यांनी व्यक्त केला.



No comments